लुटीच्या उद्देशाने युवकावर खंजिराने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:52 AM2019-02-07T00:52:49+5:302019-02-07T00:53:12+5:30
शहरातील स्रेहनगर पोलीस वसाहतीनजीक लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकावर लुटीच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला़ ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली़ युवकाने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
नांदेड : शहरातील स्रेहनगर पोलीस वसाहतीनजीक लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकावर लुटीच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला़ ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली़ युवकाने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
संजय अर्जुनराव शंकपाळे रा़राजनगर, पावडेवाडी हे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास स्रेहनगर पोलीस वसाहतीकडून जात होते़ पाटबंधारे विभागाच्या इमारतीजवळ ते लघुशंकेसाठी थांबले होते़ त्याचवेळी दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून असलेला चोरटा आला़ यावेळी त्याने शंकपाळे यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपये काढून घेतले़ त्यानंतर तो शंकपाळे यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करीत होता़
त्याचवेळी शंकपाळे यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे चिडलेल्या आरोपीने खंजिराच्या मुठीने त्यांचे डोके फोडले़ शंकपाळे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारील मैदानावर खेळणारे खेळाडू त्यांच्याकडे धावत सुटले़ हे पाहून चोरट्याने पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास मपोउपनि खर्जुले या करीत आहेत़
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवरुन येणारे चोरटे पायी जाणाऱ्यांना एकट्यात गाठून त्यांना मारहाण करीत लुबाडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ विरोध करणा-यांच्या डोक्यात खंजरची मूठ मारुन जखमी करण्याची त्यांची चोरीची पद्धतही एकसारखी असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे़