दापशेडमध्ये शेततळे हरवल्याची तक्रार !; कारवाईसाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 06:47 PM2017-12-15T18:47:52+5:302017-12-15T18:48:05+5:30
लोहा तालुक्यातील दापशेड येथे शेततळे हरवल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावरील योग्य कारवाईसाठी ग्रामस्थांनी उपोषणासही प्रारंभ केला आहे.
नांदेड : लोहा तालुक्यातील दापशेड येथे शेततळे हरवल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावरील योग्य कारवाईसाठी ग्रामस्थांनी उपोषणासही प्रारंभ केला आहे.
दापशेड येथे जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मातीबांध, नालासरळीकरण, शेततळे, विहीर पुनर्भरण आदी कामे केल्याचे कागदोपत्री दाखवून कोट्यवधी रुपये हडप करण्यात आल्याची तक्रार गावक-यांनी केली आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात कोणतेही काम नसल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे.
विहीर पुनर्भरण कामात लोहा तालुक्यामध्ये जवळपास ६ लाखांचा तर डहाळीच्या कामातही पाच लाखांचा अपहार झाल्याची बाब पुढे आले होती. मात्र या सर्व प्रकरणाची चौकशी अद्याप गूलदस्त्यातच आहे. या प्रकरणात जिल्हाधिका-यांनी कारवाई करावी,अशी मागणी भाजपाच्या दक्षिण विभागाचे युवा मोर्चा अध्यक्ष राम मोरे, अविनाश शीतळे, शिवराज टोणगे, गंगाराम शीतळे, श्यामराव शीतळे, मरीबा सोनकांबळे आदींनी केली आहे. याच मागणीसाठी गुरुवारपासून राम मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणास प्रारंभ केला आहे. दरम्यान, जिल्हाभरात जलयुक्त शिवारची कामे सुरु असली तरी या कामाच्या दर्जाबाबत मात्र आता साशंकता घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात झालेली कामे राजकीय हस्तक्षेपाविना पार पडली. पुढे मात्र मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने कामामध्ये अनागोंदी सुरु आहे. परिणामी जलयुक्तच्या तक्रारीमध्येही मोठी वाढ झाली आहे.
‘एमबी’ तयार करुन उचलले बिल...
दापशेड येथील जलयुक्तच्या कामामध्ये तीन शेततळे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. भागिरथाबाई गोविंद शीतळे, वसंतराव विठ्ठल शीतळे आणि लक्ष्मीबाई अशोक टोणगे यांच्या नावे शेततळे कागदोपत्री दाखवली खरी मात्र प्रत्यक्षात लक्ष्मीबाई टोणगे यांच्या शेततळे गट क्र. २९५ मध्ये आजघडीला कोणतेही शेततळे झाले नाही. मग कृषी विभागाने लाखो रुपये खर्चून केलेले शेततळे चोरीला गेले काय? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या शेततळ्याची एमबी तयार करुन बिलही काढण्यात आले आहे.