बेपत्ता बारसेंचा मृतदेहच सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:54 AM2019-02-01T00:54:10+5:302019-02-01T00:54:36+5:30
अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील १० दिवसापासून बेपत्ता असलेले देविदास बारसे यांचा बुधवारी रात्री नांदेड शहरानजीक गोदावरी नदीत डंकीन परिसरात मृत्तदेह सापडला आहे. त्यांचा खून करुन पोत्यात प्रेत टाकून गोदावरी नदीत फेकून देण्यात आले होते.
नांदेड : अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील १० दिवसापासून बेपत्ता असलेले देविदास बारसे यांचा बुधवारी रात्री नांदेड शहरानजीक गोदावरी नदीत डंकीन परिसरात मृत्तदेह सापडला आहे. त्यांचा खून करुन पोत्यात प्रेत टाकून गोदावरी नदीत फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरी येथील देविदास दत्तराम बारसे (वय ४०) हे २१ जानेवारी रोजी आपल्या नातेवाईकाला घेवून उपचारासाठी नांदेडला आले होते. नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करुन गावाकडे जातो, असे म्हणून ते निघाले होते. मात्र ते घरी परतलेच नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. अर्धापूर पोलिस ठाण्यात माहितीही दिली.
अर्धापूर पोलिस देविदास बारसे यांचा शोध घेत असतानाच ३० जानेवारीच्या रात्री नांदेड शहरानजिक डंकीन परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात पोत्यात टाकलेला एक मृत्तदेह सापडला. या मृत्तदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी माहिती घेतली. यावेळी सदर मृत्तदेह उमरी येथील देविदास बारसे यांचा असल्याचे उघड झाले.
या प्रकरणात वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे करीत आहेत. ३१ जानेवारी रोजी मयत बारसे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.