श्री विसर्जनादरम्यान वाहून गेलेल्या दोघांचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 04:36 PM2019-09-14T16:36:42+5:302019-09-14T16:38:39+5:30
विसर्जन मिरवणुका पाहत असताना तिघे बुडाले होते
नांदेड : श्री विसर्जनादरम्यान नांदेडमध्ये गोदावरी नदीत वाहून गेलेल्या तीन युवकांपैकी दोन युवकांचा मृतदेह शनिवारी सकाळी नवीन पूल परिसरात गोदावरी नदीत मिळाला़ शुक्रवारी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता़
गुरुवारी शहर व जिल्हाभरात श्री विसर्जन उत्साहात पार पडले़ यात नगीनाघाट येथे मात्र अप्रिय घटना घडली़ तीन युवक एका बंधाऱ्यावरून जाताना नदीत पडले़ पाण्याचा प्रवाह असल्यामुळे ते तिघेही वाहून गेले़ हे तिघेही उत्तरप्रदेशातील होते़ येथील लंगरसाहिब गुरुद्वारा येथे ते मिस्त्री काम करत होते़ श्री विसर्जनाच्या दिवशी ते गोदावरी नदीवर पोहोचले होते़ विसर्जन मिरवणुका पाहत असताना अरविंद निषाद (वय १९), रामनिवास निषाद (वय २०) आणि धर्मेंद्र धरमंडला (वय १७) हे तिघे वाहून गेले होते़ शुक्रवारी सायंकाळी धर्मेंद्रचा मृतदेह आढळला होता़ शनिवारी सकाळी नवीन पुलाजवळील रामघाट परिसरात गोदावरी नदीत अरविंद आणि रामनिवासचा मृतदेह सापडला़ या घटनेप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़