महामार्गाच्या कामात निष्काळजीपणामुळे जीव गेला; घराकडे परतणाऱ्या शेतकऱ्यास ट्रकने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:00 PM2022-03-31T13:00:16+5:302022-03-31T13:01:52+5:30
अर्धापूर तालुक्यातील दाभड परिसरातील घटना
अर्धापूर (नांदेड) : - येथील राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या कामावर असलेल्या वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडली. गजानन श्रीराम पावडे (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी संबंधीत गुत्तेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांमधून होत आहे.
नांदेड-नागपूर ३६१ राष्ट्रीय महामार्गाचे सध्या काम सुरु आहे. महामार्गाच्या कामासाठी येथे मोठ्याप्रमाणावर जडवाहतूक सुरु असते. मात्र, या कामात गुत्तेदाराचा निष्काळजीपणा पुढे आला आहे. दाभड येथील शेतकरी गजानन श्रीराम पावडे दिवसभर शेतातील हळद राखणीकरून घराकडे येत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील दाभड सत्यगणपती मंदिरासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ट्रक अचानक मागे आला. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या पावडे यांना ट्रकने जोरदार धडक दिली.
यात शेतकरी पावडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर अपघात प्रकरणी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव,पोउनि कपिल आगलावे महामार्गचे पोनि अरुण केन्द्रे, प्रभारी शंकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर तिडके, सुमित बनसोडे,प्रभाकर करडेवाड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.