विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:34 AM2020-12-12T04:34:27+5:302020-12-12T04:34:27+5:30
अवैध वृक्षतोड नायगाव बाजार - तालुक्यातील कृष्णूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने माळरान वने वाळवंट होण्याच्या मार्गावर ...
अवैध वृक्षतोड
नायगाव बाजार - तालुक्यातील कृष्णूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने माळरान वने वाळवंट होण्याच्या मार्गावर आहेत. कृष्णूर, गंगनबीड, नीळगव्हाण, हिप्परगा, घुंगराळा, सोमठाणा या शिवारातील कडुलिंब, जांभूळ, आंबा, चिंच आदी जातींच्या झाडांची अवैध कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
राष्ट्रीयीकृत बँक हवी
नायगाव - तालुक्यातील घुंगराळा येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. घुंगराळा येथे बँक स्थापन केल्यास शेजारील वंजारवाडी, रुई बु., सावरखेड, गंगनबीड, रानसुगाव, ताकबीड, निळेगव्हाण आदी गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
दुचाकी लंपास
किनवट - गोकुंदा येथील बळीराम पाटील महाविद्यालयाजवळच्या सार्वजनिक रस्त्यावरून ५ डिसेंबर रोजी दुचाकी (क्र. एम.एच.२६-वाय.ओ. २८३) लांबविण्यात आली. सदर दुचाकी निवृत्त पोलीस कर्मचारी शेख वाहेद अली कुर्बान यांची आहे. किनवट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला.
हॉटेलमधून मोबाईल लंपास
किनवट - बोधडी बु. बसस्थानकाजवळ असलेल्या एका हॉटेलातून विद्यार्थ्याचा मोबाईल लांबविण्यात आल्याची घटना ८ डिसेंबर रोजी दुपारी घडली. नीलेश राठोड (रा. जरूरतांडा, ता.किनवट) हा मोबाईल टेबलवर ठेवून चहा घेत असताना त्याची नजर चुकवून चोरट्याने मोबाईल लंपास केला. मोबाईलची किंमत १६ हजार असल्याचे राठोड याने किनवट पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले.
शिवसेनेचा बहिष्कार
लोहा - गुरुवारी लोहा खरेदी विक्री संघाच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमावर शिवसेनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आल्याचे तालुकाप्रमुख संजय ढाले यांनी सांगितले आहे. खरेदी विक्री संघाच्या जाहिरातीमध्ये खा. हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर यांचे फोटो नाहीत, शिवाय या कार्यक्रमात शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचे ढाले यांनी पत्रकात नमूद केले.
महिलांसाठी स्वच्छतागृह हवे
मुदखेड - शहरात मुख्य बाजारपेठेमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे गैरसोय होत आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे शिवानंद देवके, नगरसेवक कमलेश चौदंते, राहुल चौदंते आदींनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन वरील मागणी केली आहे.
अवैध दारू विक्री
मुखेड - तालुक्यातील मंग्याळ, सावरगाव पी. परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूवर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा तालुका उपप्रमुख गंगाधर पिटलेवाड यांनी दिला. दारू ही हातभट्टीत रसायनमिश्रित आहे. दारू पिल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे पिटलेवाड यांनी नमूद केले.
इमारतीचे काम सुरू
लोहगाव - येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. जुनी इमारत जीर्ण झाल्याने जि.प. आरोग्य विभागाने दीड कोटीचा निधी नवीन इमारतीसाठी उपलब्ध करून दिला आहे. इमारतीचे काम जोमात सुरू असल्याने वरिष्ठांनीही कामाचा दर्जा राखला जाईल याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.