पोलिस ठाण्यात विष घेतलेल्या दाम्पत्यातील पतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:41 AM2018-12-05T00:41:39+5:302018-12-05T00:44:39+5:30
मुखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास आली असता मुखेड पोलिस स्टेशनच्या आवारातच पती शिवशंकर पाटील यांनी विष प्राशन केले़ तर त्यापाठोपाठ पत्नी आश्विनी पाटील यांनीही विषाची बाटली तोंडाला लावली होती़
मुखेड : येथील वाल्मिकनगर येथील शिवशंकर नरसिंगराव पाटील (३४) या युवकाचे व त्याच्या पत्नीचे सतत भांडण होत असल्याने पत्नी आश्विनी शिवशंकर पाटील (२८) यांनी २७ नोव्हेंबर रोजी मुखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास आली असता मुखेड पोलिस स्टेशनच्या आवारातच पती शिवशंकर पाटील यांनी विष प्राशन केले़ तर त्यापाठोपाठ पत्नी आश्विनी पाटील यांनीही विषाची बाटली तोंडाला लावली होती़ उपचारा दरम्यान यातील शिवशंकर पाटील यांचा ३ डिसेंबर रोजी मृत्यू झाला़
मयताची आई शकुंतलाबाई नरसिंगराव पाटील (रा. वाल्मीक नगर, मुखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुलगा शिवशंकर पाटील व त्याची पत्नी अश्विनी पाटील यांच्यात सतत भांडण होत असे़ त्यामुळे अश्विनी पाटील या २७ नोव्हेंबर रोजी मुखेड पोलिसात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या़ त्याचवेळी माझा मुलगा शिवशंकर पाटील यास ते सहन न झाल्याने त्याने मुखेड पोलिस स्टेशनच्या आवारातच विष प्राशन केले होते़ दरम्यान, शिवशंकर यांच्यानंतर पत्नी अश्विनी यांनी मीही मरते असे म्हणत खाली पडलेली विषाची बाटली तोंडाला लावली होती़ अश्विनी यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
मयताच्या आईच्या तक्रारीवरुन मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांच्या विरोधात मुखेड पोलिसात आश्विनी शिवशंकर पाटील यांच्यासह नऊ जणांविरोधात ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे व पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिथुन सावंत हे करीत आहेत.
तब्बल तासभर प्रेत ठाण्यातच ठेवले
मयत शिवशंकर पाटील नांदेड येथे उपचारा दरम्यान मयत झाले तेव्हा नातेवाईकांनी मुखेड पोलिस स्टेशनमध्ये प्रेत ठेवले व मयतास कारणीभूत असणाºयांवर कारवाई करावी अशी मागणी केली़ यावेळी पोलिस उपाधीक्षक व पोनि़सुभाष राठोड यांनी मयताच्या नातेवाईकांशी संवाद साधत आरोपी विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाºया ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला़ मयताच्या नातेवाईकांनी मुखेड पोलिस स्टेशन येथे तब्बल एक तास प्रेत ठेवले होते़ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर त्यांचे प्रेत उचलण्यात आले़ ४ डिसेंबर रोजी मुखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ मयतास आई, वडिल, भाऊ, एक लहान मुलगा व एक मुलगी आहे.