अमृत योजनेतील झाडांची तपासणी करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:25 AM2019-02-12T00:25:50+5:302019-02-12T00:26:08+5:30

शहरात अमृत योजनेअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याची तपासणी करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे एकूणच शहरातील वृक्षारोपणाचा हा विषय ऐरणीवर आला आहे.

Decision to inspect the trees in the nectar scheme | अमृत योजनेतील झाडांची तपासणी करण्याचा निर्णय

अमृत योजनेतील झाडांची तपासणी करण्याचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देस्थायी समिती बैठक, विद्युत देखभाल दुरुस्तीचे ठरावही मंजूर

नांदेड : शहरात अमृत योजनेअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याची तपासणी करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे एकूणच शहरातील वृक्षारोपणाचा हा विषय ऐरणीवर आला आहे.
स्थायी समितीचे सभापती फारुख अली खान यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत चार विषयांवर चर्चा करण्यात आली. अमृत योजनेअंतर्गत शहरात लावण्यात आलेल्या झाडांची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याची माहिती द्यावी, असा ठराव अ. रशीद अ. गणी यांनी ठेवला होता. या विषयावर चर्चा करताना शहरात अमृत योजनेअंतर्गत झाडे लावण्यासाठी लातूरच्या जन आधार सेवाभावी संस्थेला ८ आॅगस्ट २०१८ च्या ठरावान्वये काम देण्यात आले होते. या योजनेअंतर्गत किती झाडे लावण्यात आली, किती काम शिल्लक आहे, संबंधित ठेकेदाराला किती देयक अदा करण्यात आले आहे, त्याचे किती देयक प्रलंबित आहे याची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.या विषयावरील चर्चेत सभागृहात सदर योजनेअंतर्गत ५ हजार ५० झाडे लावण्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या झाडांची प्रत्यक्ष काय स्थिती आहे ही बाब मात्र प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रकरणाचे गांभीर्य आणखीच वाढले. या योजनेअंतर्गत झालेले काम पाहण्यासाठी उद्यान अधीक्षक तथा सहायक आयुक्त डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग, अंतर्गत लेखा परीक्षक विलास भोसीकर यांच्यासह अ. रशीद अ. गणी यांच्यापुढे सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. दोन दिवसांत सदर कामाचा अहवाल स्थायी समितीपुढे ठेवावा, असे आदेशही सभापती फारुख अली खान यांनी दिले.
याच बैठकीत उत्तर नांदेड शहरातील झोन क्र.१, २ व ३ मधील सार्वजनिक पथदिव्यांची दैनंदिन देखभाल व दुरुस्तीच्या कामासही मंजुरी देण्यात आली. सदर काम परभणी येथील मे. जय एंटर प्राईजेस यांना देण्यात आले आहे. या कामासाठी जवळपास ९० लाख २८ हजार रुपये वार्षिक खर्च येणार आहे. तर दक्षिण नांदेडमधील झोन क्र. ४, ५, ६ मधील सार्वजनिक पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी ६८ लाख ५३ हजार २४५ रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम मे. नांदेड इलेक्ट्रीकल्स इंजिनिअर्स या ठेकेदारास देण्यात आले आहे.
महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर क्लोरीनेटर्स ही यंत्रणा पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या खर्चासही स्थायी समितीने मंजुुरी दिली आहे. सदर काम देशकुल क्लोरीनेशन प्रा. लि. पुणे यांना देण्यात आले आहे.
या बैठकीस स्थायी समिती सदस्य मसूद खान, भानुसिंह रावत, दयानंद वाघमारे, श्रीनिवास जाधव, ज्योती कल्याणकर, वैशाली देशमुख,पूजा पवळे, उपायुक्त विलास भोसीकर, अजितपाल संधू, लेखाधिकारी संतोष कंदेवार, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, गिरीष कदम आदींची उपस्थिती होती.
उघड्या चेंबरला झाकणे बसविणार
शहरातील उघड्या ड्रेनेज चेंबरमुळे अनेक अपघात होत आहेत.याबाबत नगरसेवकांकडून वारंवार मागणी केली जात आहे. ही बाब लक्षात घेता शहरातील उघड्या चेंबर्सची झाकणे त्वरित बसविण्यात यावीत, असे आदेश सभापती फारुख अली खान यांनी या बैठकीत दिले. उघड्या असलेल्या चेंबरर्सची पाहणी करुन त्या चेंबरवर तात्काळ झाकणे बसविण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उघड्या ड्रेनेज चेंबरचा विषय चर्चेला आला होता. त्यावेळी प्रशासनाने तात्काळ ड्रेनेज चेंबरची झाकणे बसविण्यात येतील, असे सांगितले होते.

Web Title: Decision to inspect the trees in the nectar scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.