जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय आता नागरिकांच्या हातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:43+5:302021-06-10T04:13:43+5:30
यातून संभाव्य तिसरी लाट रोखली जाईल. त्याचवेळी पॉझिटिव्हीटी वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच नियमावलींचे पालन ...
यातून संभाव्य तिसरी लाट रोखली जाईल. त्याचवेळी पॉझिटिव्हीटी वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच नियमावलींचे पालन करून जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी नागरिकांच्या सहकाऱ्याने कोरोनाची दुसरी लाट रोखता आल्याचे डॉ. विपीन म्हणाले. परंतु, हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी आगामी काळातही नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. शहर व जिल्ह्यातील बाजारातील गर्दी पाहता अजूनही धोका कायम असल्याचेच स्पष्ट होत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पॉझिटिव्हिटी वाढल्यास निर्बंधही पुन्हा लादावे लागणार आहेत.
जिल्ह्यात लसीकरणाचीही मोहीम वेग घेत आहे. आगामी काळात लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. त्यामुळे लसीकरणही वेगात होईल. ग्रामीण भागातील नागरिकांनी लसबाबत सुरू असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही केले. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत पोलिसांनी संयमी भूमिका घेतल्याचे सांगितले. हा निर्णय प्रशासनाचा होता, असे ते म्हणाले. कोरोनामुळे पोलीस दलातील ५५० कर्मचारी बाधित झाले होते. दुर्दैवाने नऊ जणांचा मृत्यूही झाल्याचे शेवाळे यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने चांगले परिश्रम घेतले. जिल्ह्यातील भोसी गावच्या कोरोनामुक्ती पॅटर्नची केंद्रानेही दखल घेतली. इतर गावांनीही चांगली कामगिरी बजावल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, मनपा उपायुक्त शुभम क्यातमवार यांचीही उपस्थिती होती.
चौकट-------------
तिसऱ्या लाटेची तयारी
जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी केली जात आहे. यासाठी ग्रामीण भागातही टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून उपचारांसाठी आवश्यक त्या वैद्यकीय साधनांची पूर्तता केली जात आहे. लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. बालरोग तज्ज्ञांच्या मदतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे डॉ. विपीन यांनी सांगितले.