देगलूर विधानसभेचा सस्पेन्स कायम; कॉँग्रेस-भाजप मतदारसंघाबाबत वेगळा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 07:23 PM2024-10-26T19:23:04+5:302024-10-26T19:26:54+5:30

भाजपा व काँग्रेसकडून अनेक इच्छुकांची तयारी; मात्र दोन्ही पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केला नाही.

Deglur Assembly Suspense Continues; Will Congress-BJP take a different decision regarding constituencies? | देगलूर विधानसभेचा सस्पेन्स कायम; कॉँग्रेस-भाजप मतदारसंघाबाबत वेगळा निर्णय घेणार?

देगलूर विधानसभेचा सस्पेन्स कायम; कॉँग्रेस-भाजप मतदारसंघाबाबत वेगळा निर्णय घेणार?

- शेख शब्बीर
देगलूर:
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला तर महायुतीमधून भाजपाला हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेस तसेच भाजपाकडून जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीमध्ये देखील देगलूर मतदार संघाचा उल्लेख नाही. यामुळे हा मतदार संघ सहयोगी पक्षाला तर सुटणार नाही ना? याबाबत मतदार संघात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या या मतदारसंघात एकूण चार वेळा निवडणूका झाल्या. या चारही निवडणुकीत मुख्य लढती काँग्रेस विरुद्ध शिवसेना, काँग्रेस विरुद्ध भाजपा यांच्यामध्ये झाल्या . त्यातच 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा होऊन कॉँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे यावेळी देखील याच दोन पक्षात लढत होईल असे गृहीत धरून भाजपा व काँग्रेसकडून अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारीही चालविली. 

कॉँग्रेस मित्र पक्षांना जागा सोडणार?
विशेष म्हणजे, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देगलूरचे विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाचे कमळ हाती घेतलले. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी जवळपास 40 इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यातच उमेदवार स्थानिक असावा अशी मागणी पुढे येत असतानाच बौद्ध समाजाने अद्याप मतदारसंघाचे नेतृत्व केले नसल्याने बौद्ध समाज उमेदवारीसाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे एकीकडे  इच्छुक उमेदवारांची वाढलेली संख्या तर दुसरीकडे उमेदवारीवरून बौद्ध समाजाची नाराजी ओढवून घेण्याची कटकट नको म्हणून हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस पक्ष फारसा उत्सुक नसल्याची चर्चा मतदार संघात रंगली आहे. त्यातच काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या व दुसऱ्या यादीत देगलूर विधानसभेचे नाव नसल्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना सुटतो की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

देगलूरमध्ये महायुतीचा 'लोहा पॅटर्न'?
तर दुसरीकडे काँग्रेस मधून भाजपात गेलेल्या विद्यमान आमदारांचे भाजपाकडून तिकीट फायनल झाल्याचे सांगितले जात होते. त्यादृष्टीने त्यांच्याकडून तयारीही केली जात आहे.मात्र महायुतीतील भाजपाकडून दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र त्यामध्ये देगलूर विधानसभेचे नाव न आल्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. तर दुसरीकडे देगलूर मतदार संघ हा महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सुटला असल्याची चर्चा रंगली आहे.त्यामुळे देगलूर मतदार संघातही लोहा पॅटर्न राबविला जाणार का? भाजपात इच्छुक असलेले आमदार महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून निवडणुकीला सामोरे जातात का? याबाबत मतदार संघात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Web Title: Deglur Assembly Suspense Continues; Will Congress-BJP take a different decision regarding constituencies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.