पदवी परीक्षा उरली नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:51 PM2017-11-17T23:51:54+5:302017-11-17T23:51:58+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरू केलेल्या होम परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षण करण्यात येत असल्याने आणि प्राध्यापकही तेच असल्याचे परीक्षार्थीमध्ये कुठलीही भीती राहिली नसल्याचे चित्र आहे़
भारत दाढेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरू केलेल्या होम परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षण करण्यात येत असल्याने आणि प्राध्यापकही तेच असल्याचे परीक्षार्थीमध्ये कुठलीही भीती राहिली नसल्याचे चित्र आहे़
स्वारातीम विद्यापीठाने स्थापनेपासून अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीत वेगळा आकृतिबंध निर्माण करून नवा पॅटर्न निर्माण केला होता़ परंतु सद्य:स्थितीतील विद्यापीठाचा पदवीचा अभ्यासक्रम परीक्षा पद्धतीमुळे घसरत चालला आहे़ सीबीसीएस अभ्यासक्रम, सत्र परीक्षा, होम परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा बट्ट्याबोळ झाला आहे़ महाविद्यालयात झालेल्या परीक्षेचे पेपर मूल्याकंन, फेरतपासणी त्याच प्राध्यापकांनी करायची हा नवा नियम विद्यापीठाने लागू केला आहे़ पदवी परीक्षेतील केंद्रावर बहि:स्थ पर्यवेक्षक, भरारी पथक नसल्याने होम परीक्षेत सर्वत्र कॉप्यांचा सुळसुळाट सुरू आहे़ आपल्याच विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यास महाविद्यालय प्रशासन पुढे येत नाही़
विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ़ जनार्दन वाघमारे यांनी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल केले होते़ विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात कॉपीमुक्तीचा नवा पॅटर्न तयार झाला होता़ परीक्षार्थ्याने कॉपी करून नये म्हणून डब्ल्यूपीसी, एसपीसी, निकाल राखून ठेवणे यासारखे नवीन नियम लागू केले होते़ त्यामुळे कॉपीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला होता़
परंतु आता या विद्यापीठाने पदवी परीक्षेत सत्र परीक्षा लागू केली़ त्यानंतर चॉईस बसे क्रेटीट सिस्टिम लागू केली़ यामध्ये विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न, अंतर्गत गुण लागू केल्याने नापास होण्याची भीती कमी झाली़ गत दोन वर्षांपासून होम परीक्षा सुरू करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण केली आहे़ परीक्षा महाविद्यालयात घेण्यात येत असून परीक्षा केंद्रावर परीक्षण करणारे प्राध्यापकही तेच असल्याने परीक्षार्थ्यांना कोणतीच भीती राहिली नाही़ परीक्षेसाठी बहि:स्थ पर्यवेक्षक म्हणून नेमणुका यावर्षी विद्यापीठाने बंद केल्यामुळे कॉपीसाठी रान मोकळे करून दिले आहे़ परीक्षा आपल्याच महाविद्यालयात देवून पेपर तपासणीही तेच प्राध्यापक करणार असल्याने परीक्षक आपल्या विद्यार्थ्यांना हात सोडून गुणदान देवून महाविद्यालयाचा निकाल चांगला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत़ विद्यापीठाने मॉडरेशन ही त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकाने करण्याचा नियम काढला आहे़