आयुक्ताअभावी महापालिकेचे बजेट लांबणीवर; दैनंदिन कामकाजावरही परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 04:38 PM2020-02-26T16:38:27+5:302020-02-26T16:42:21+5:30
महापालिका आयुक्त महिनाभरापासून रजेवर
नांदेड : महापालिकेचा पदभार कोणाकडेही नसल्याची अभूतपूर्व परिस्थिती नांदेडमध्ये दुसऱ्यांदा उद्भवली आहे. गेल्या महिनाभरापासून आयुक्त नसल्यामुळे कारभार तर थंडावला आहेच ; पण आता आगामी आर्थिक वर्षातील नियोजनही कोलमडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी हे २६ डिसेंबरपासून वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेले आहेत. त्यानंतर तब्बल १४ दिवस महापालिकेचा पदभार कोणाकडेही सोपविला नव्हता. त्यामुळे महापालिकेसारखी स्थानिक स्वराज्य संस्था अधिकाऱ्याविनाच कार्यरत होती. अखेर ९ जानेवारी २०२० रोजी महापालिकेचा पदभार तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे सोपविला. याच कालावधीत १३ फेब्रुवारी रोजी परभणीचे जिल्हाधिकारी पी. सिवा शंकर यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश धडकले. त्यात पुन्हा ४८ तासांतच फेरबदल होताना १५ फेब्रुवारी रोजी लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नांदेड जिल्हाधिकारीपदी बदली झाली. ते १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारीपदी रुजूही झाले.
महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार असलेल्या अरुण डोंगरे यांच्या बदलीचे आदेश १४ फेब्रुवारी २०२० रोजी आले. डोंगरे यांची शिर्डीच्या श्री साईबाबा विश्वस्त समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. त्यामुळे मनपात सध्या जबाबदार अधिकारी कोणीही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फटका मनपाच्या दैनंदिन कारभारावर पडत आहे. सध्या कोणाचे कोणावर नियंत्रण नसल्याचीही परिस्थिती उद्भवली आहे. त्याचवेळी धोरणात्मक निर्णयही घेतले जात नाहीत. विशेष म्हणजे, महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून २० फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीकडे येणे अपेक्षित होते. मात्र, आयुक्तांअभावी ही प्रक्रिया अद्याप सुरूच झाली नसल्याचे चित्र आहे.
लेखा विभागाकडून याबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात महापालिकेच्या खर्चाचे नियोजन कसे राहील? ही बाबही प्रश्नार्थकच आहे. महापालिका आयुक्त आल्याशिवाय अर्थसंकल्पाला गती मिळणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यातच महापालिकेची सर्वसाधारण सभाही आयुक्तांअभावी घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींचा मनपाच्या कारभारावर परिणामच झाला आहे.
प्रशिक्षणार्थी उपायुक्तांवरच कारभार
नांदेड महापालिकेचा पदभार १४ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा वाऱ्यावर आहे. अकरा दिवसांपासून मनपा अधिकाऱ्याविना चालत आहे. महापालिकेत शासन नियुक्त एक उपायुक्त सध्या कार्यरत आहेत. त्यातही ते अधिकारी प्रशिक्षणार्थीच आहेत. उर्वरित तीनही उपायुक्त प्रभारी आहेत. महापालिकेत दोन शासननियुक्त सहायक आयुक्त नुकतेच रुजू झाले आहेत. तेही प्रशिक्षणार्थीच आहेत. त्यामुळे मनपाचा कारभार सध्या प्रभारीवर सुरू आहे.
या प्रभारी कारभाराबाबत शहरवासीयांमध्ये नाराजी असताना आता महापालिकेला प्रभारी आयुक्तही मिळू नये, याबाबतही नवलच होत आहे. शासनस्तरावरही महापालिकेसारखी संस्था वाऱ्यावर सोडली जात आहे. ही बाबही गंभीरच आहे. यापूर्वीही चौदा दिवस महानगरपालिका अधिकाऱ्यांविनाच चालली होती.४महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी हे २६ डिसेंबरपासून वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेले आहेत. त्यानंतर तब्बल १४ दिवस महापालिकेचा पदभार कोणाकडेही सोपविला नव्हता.