इनामी जमीन लीजवर देण्यासाठी लाचेची मागणी; जिल्हा वक्फ अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 07:36 PM2020-12-02T19:36:28+5:302020-12-02T19:43:22+5:30
जमीनीतील एक एकर जागा फंक्शन हाॅलसाठी लीजवर देण्या संदर्भात तक्रारदाराने वक्फ बोर्डाकडे अर्ज केला होता.
नांदेड : इनामी जमीन फंक्शन हाॅलसाठी लीजवर देण्यासाठी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन दीड लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या जिल्हा वक्फ अधिकारी आणि सेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
धर्माबाद येथे वक्फ बोर्डाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. या जमीनीतील एक एकर जागा फंक्शन हाॅलसाठी लीजवर देण्या संदर्भात तक्रारदाराने वक्फ बोर्डाकडे अर्ज केला होता. त्यानंतर जिल्हा वक्फ अधिकारी शेख लतीफोद्दीन मो. मोहम्मद गाैस मोहीयोद्दीन यांनी तक्रारदाराला पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड या ठिकाणी अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी तक्रारदारांकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधला. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.
तसेच तक्रारदाराकडून लाचेतील ५ लाख रुपयातील पहिला हप्ता म्हणून तडजोडी अंती दीड लाख रुपये स्वीकारताना आरोपींना पकडण्यात आले. विशेष म्हणजे याच कार्यालयातील सेवक मोहम्मद इमरान मोहम्मद रब्बानी याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि कपिल शेळके, किशन चिंतोरे, सचिन गायकवाड, विलास राठोड, अंकुश गाडेकर, नरेंद्र बोडके, आशा गायकवाड यांचा या कारवाईत सहभाग होता.
पथकाने रंगेहाथ पकडले
तक्रारदाराकडून लाचेतील ५ लाख रुपयातील पहिला हप्ता म्हणून तडजोडी अंती दीड लाख रुपये स्वीकारताना आरोपींना पकडण्यात आले.