नांदेड, देगलूर, बारड महामार्ग औरंगाबाद विभागाला जोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:38+5:302021-04-26T04:15:38+5:30
बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून रस्ते अपघाताला आळा बसावा, अपघातातील जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ...
बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून रस्ते अपघाताला आळा बसावा, अपघातातील जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा पथकाचे वसमतफाटा येथे केंद्र असून, दुसरे केंद्र बारड येथे कार्यान्वित आहे, तसेच तिसरे केंद्र हे देगलूर येथे लवकरच सुरू होणार आहे. राज्यात महामार्ग सुरक्षा पथकांतर्गत ठाणे, पुणे व नागपूर असे तीन महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रादेशिक विभाग होते. प्रत्येक प्रादेशिक विभागाला एक पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी हे महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभागाचे प्रभारी म्हणून कामकाज पाहत होते. दरम्यान, राज्य शासनाने नुकतेच मराठवाड्यासाठी स्वतंत्र महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभागाची मंजुरी देऊन स्वतंत्र पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त केले आहेत.
नांदेडहून नागपूरला जाण्या-येण्यासाठी पुणे-औरंगाबाद-मुंबईच्या तुलनेत रेल्वे किंवा इतर वाहने वेळेवर नसल्यामुळे नागपूरला ये-जा करण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथक केंद्र नांदेड व बारडचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना, तसेच काही दिवसांतच सुरू हाणारे तिसरे केंद्र देगलूर यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या अडचणींचा विचार करून नांदेड, बारड, देगलूर हे महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग नागपूरमधून वगळून नव्याने मंजूर झालेल्या औरंगाबाद सुरक्षा पथक प्रादेशिक विभागाशी जोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
चौकट.........
मराठवाड्यातील नांदेड जिल्हा वगळता शेजारील लातूर, परभणी, जिंतूरसह इतर ७ जिल्ह्यांतील महामार्ग सुरक्षा पथक केंद्र हे महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत आहेत.
केवळ नांदेड व बारड हे दोनच केंद्रे महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग नागपूर अंतर्गत आहेत. दैनंदिन कामकाज, कार्यालयीन टपाल, बॅरिकेट्स व इतर साहित्य ने-आण करण्यासाठी, तसेच प्रशिक्षण, मासिक बैइक व इतर महत्त्वाचा बंदोबस्त, तसेच बैठकांसाठी नांदेड, बारडहून व नवीन केंद्र देगलूर महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग नागपूरला ये-जा करावे लागते.