नवे कोविड सेंटर उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:28 AM2021-05-05T04:28:43+5:302021-05-05T04:28:43+5:30
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या ...
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल
नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी एका तरुणासह पोलीस कर्मचारी असलेल्या त्याच्या बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरवाडे हे करीत आहेत.
बाल नरसय्या सेवानिवृत्त
नांदेड : जिल्हा माहिती कार्यालयात गत ३४ वर्षांपासून सेवेत असलेले बाल नरसय्या अंगली हे सेवानिवृत्त झाले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी माहिती सहायक अलका पाटील, दूरमुद्रणचालक विवेक डावरे, छायाचित्रकार विजय होकर्णे, म. युसूफ म. मौलाना, गंगाधर निरडे आदी उपस्थित होते.
कोविड लस उपलब्ध करण्याची मागणी
नांदेड : सिडको वसाहतीतील मनपाच्या मातृसेवा आरोग्य केंद्रात सहा दिवसांपासून कोविड लस उपलब्ध नाहीत. परिणामी, नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने कोविड लस त्वरित उपलब्ध करून द्यावी; अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील व विधानसभा अध्यक्ष दीपक भरकड तसेच गजानन शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बांधकाम कामगारांना अनुदान द्या
नांदेड : लॉकडाऊनमुळे बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने नोंदणीकृत कामगारांना मदतीची घोषणा केली आहे. दीड हजार रुपये अनुदान यापोटी कामगारांना मिळणार आहे. मात्र, हे अनुदान तुटपुंजे असल्याने आणखी दीड हजार वाढीव अनुदान देण्याची मागणी भाजप उद्योग आघाडीचे व्यंकट पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने टीचर्स क्लब रुग्णालय कौठा येथे घेण्यात आलेल्या शिबिराला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १०७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भाेसीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहम्मद खान पठाण, वसंत सुगावे, जीवन घोगरे, भाऊसाहेब गोरठेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.