कोरोना शून्यावर असलेल्या उमरी तालुक्यात शाळा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:07+5:302020-12-25T04:15:07+5:30
उमरी : तालुक्यात सध्या कोरोना साथरोग शून्यावर आला असून या साथ रोगाचा एकही रुग्ण या तालुक्यात ...
उमरी : तालुक्यात सध्या कोरोना साथरोग शून्यावर आला असून या साथ रोगाचा एकही रुग्ण या तालुक्यात नसल्याने उमरी तालुक्यातील सर्व शाळा पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
कोरोना साथ रोगाच्या भीतीमुळे शासनाने सर्व शाळा बंद ठेवल्या . गेल्या महिनाभरात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्याखालील सर्व वर्ग सध्या बंद आहेत. वास्तविक पाहता लहान मुलांना तसेच हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकविणे अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाइन किंवा व्हर्च्युअल शिक्षणाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटलेली दिसत आहे. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड फोन उपलब्ध नाहीत. एखादी बाब समजली नाही तर विद्यार्थ्यांना विचारण्याची सोय नाही. म्हणून शासनाने पहिली पासूनचे वर्ग सुरू करणे आवश्यक झाले आहे. यामुळे मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण होईल. तसेच विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल . या सर्व बाबी लक्षात घेता शासनाने उमरी तालुक्यात प्राथमिक व हायस्कूलचे वर्ग पूर्ववत सुरू करावेत . अशी मागणी पालक वर्गातून होत आहे . उमरी तालुक्यात गेल्या महिन्यांपासून कोरोना हा साथरोग शून्यावर आलेला आहे. या तालुक्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही किंवा दोन महिन्यांपासून एकही रुग्ण बाहेरच्या शहरात सुद्धा दाखल झालेला नाही. ही बाब लक्षात घेता उमरी तालुक्यातील पहिली ते आठवीचे सर्व वर्ग सुरू करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.