पिक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगणारी - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:29 PM2018-06-23T12:29:56+5:302018-06-23T12:34:29+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारी घटना घडली होती.
नांदेड : पिक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.
काल बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारी घटना घडली होती. याप्रकरणी दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यांविरुध्द संबधित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले कि, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार असुन, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट माझा हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. तसेच या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करुन चालणार नाही, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी खासदार चव्हाण यांनी केली.
पिक विमा वाटपात पक्षपात
पिक विम्याची रक्क्म वाटप करतांना सरकार पक्षपात करत असून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात जास्त रक्क्म वाटप होते तर विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघात तूट्पुंजी रक्क्म दिली जाते असा आरोप खासदार चव्हाण यांनी केला. काही मतदारसंघात पाच लाख तर काही मतदार संघात रुपयाही दिलेला नाही, पिक विमा वितरणाची पद्धत फक्त सत्ताधारी पक्षापुर्ती मर्यादीत आहे का असा प्रश्ननही त्यांनी उपस्थित केला.