आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:55+5:302020-12-08T04:14:55+5:30
नांदेड- केंद्राच्या कृषी धोरणाविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ...
नांदेड- केंद्राच्या कृषी धोरणाविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी नांदेड येथेही धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला गुरुद्वारा सचखंड बोर्डानेही पाठिंबा जाहीर केला असून, दिल्लीच्या लंगरसाठी मंगळवारी गुरुद्वारा बोर्डाची ५० जणांची टीम दिल्लीला रवाना होणार आहे. समूह हजुरी साथ संगत श्री हुजूर साहिब नांदेड व जिल्ह्यातील नागरिक शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. नांदेडची धरती ही श्री. गुरुगोविंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. या भूमीतून दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून देशात समृद्धी व स्थिरता आणावी, असे आवाहन संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी यावेळी केले. आंदोलनाच्या प्रारंभी गुरुद्वारामध्ये अरदास करण्यात आली. त्यानंतर शीख बांधवांसह शेतकरी, नागरिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सत नाम वाहे गुरुंचा पाठ करून शबद गायन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महापौर मोहिनी येवनकर, सुखविंदरसिंघ हुंदल, राजेंद्रसिंघ पुजारी, बोर्डाचे सदस्य गुरमीतसिंघ महाजन, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, विरेंद्रसिंघ गाडीवाले, गुरमितसिंघ नवाब, भागेंदरसिंघ घडीसाज, रविंद्रसिंघ मोदी, अवतारसिंघ पहरेदार, सुरेंद्रसिंघ, प्रकाशकौर खालसा आदींची उपस्थिती होती.
चौकट.......
गुुरुद्वारा बोर्ड दिल्ली येथे सुरू करणार लंगर
केंद्राच्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुद्वारा सचखंड बोर्डाने पाठिंबा जाहीर केला असून, दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी लंगर सामूग्री घेऊन ५० जणांची टीम मंगळवारी बोर्डाचे सचिव स.रविंद्रसिंघजी बुंगई यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे रवाना होणार आहे.
फोटो कॅप्शन - केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सोमवारी संत बाबा बलविंदरिसंघजी यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शीख बांधवांसह शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येेने सहभागी झाले होते.
फोटो नं.०७एनपीएचडीईसी०३.जेपीजी