रिंगणातील १६६ पैकी १४५ उमेदवारांचे झाले डिपॉझिट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:10 AM2019-04-12T00:10:13+5:302019-04-12T00:10:59+5:30
देशातील सर्वोच्च निवडणूक असलेल्या लोकसभा निवडणूक लढवून संसदेत जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. यासाठी ते प्रयत्नही करतात.
अनुराग पोवळे।
नांदेड : देशातील सर्वोच्च निवडणूक असलेल्या लोकसभा निवडणूक लढवून संसदेत जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. यासाठी ते प्रयत्नही करतात. मात्र प्रत्यक्षात आपल्याला किती मतदान होते, याचा अदमास न आल्याने या उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचविता येत नाही. नांदेड लोकसभेच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत १६६ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. त्यातील १४५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
नांदेड लोकसभेची १९५१ मध्ये पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी ४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. १९५७ च्या निवडणुकीत ४ उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीत चारही उमेदवारांचे डिपॉझिट अबाधित राहिले होते.एकूण मतदानाच्या १६ टक्क्यांहून अधिक मते मिळाली. १९७७ च्या निवडणुकीत नांदेड मतदारसंघात केवळ दोनच उमेदवार रिंगणात होते. सर्वाधिक २१ उमेदवारांचे डिपॉझिट १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत जप्त झाले होते. या निवडणुकीत ४ उमेदवार रिंगणात होते. २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती राहिली. प्रत्येकी २० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. २००९ मध्ये २२ तर २०१४ मध्ये २४ उमेदवार रिंगणात होते. २०१९ च्या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात आहेत़
डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?
एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.