अतिवृष्टीने बाधित शेतक-यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:45+5:302021-01-08T04:53:45+5:30
नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील पिकांचे ३३ ...
नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करून कृषी व महसूल विभागाने अहवाल पाठविले होते. बाधित ७ लाख ४४ हजार ९३७ शेतक-यांना शासनाने जाहीर केलेल्या रकमेनुसार अनुदान देण्यास ५६५ कोटी १३ लाख ३६ हजार ३५० रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. परंतु शासनाने पहिल्या टप्प्यात २८४ कोटी रुपये नांदेड जिल्ह्यासाठी पाठविले. त्यामुळे बाधित शेतक-यांना संपूर्ण रक्कम देणे शक्य नसल्याने जिल्हा प्रशासनाने बाधित क्षेत्रानुसार ५० टक्के रक्कम पहिला टप्पा म्हणून शेतक-यांच्या खात्यात वर्ग केले. यामध्ये नांदेड तालुक्यातील बाधित शेतकरी संख्या २६ हजार ३९२, अर्धापूर- २९ हजार ११४, कंधार - ६१ हजार ४२५, लोहा - ८४ हजार ६२१, बिलोली - ५२ हजार ९०३, नायगाव- ५३ हजार ७३१, देगलूर - ४९ हजार ८६९, मुखेड - ६७ हजार ७८८, भोकर - ४३ हजार ५१३, मुदखेड - ३४ हजार, धर्माबाद - २३ हजार ६८७, उमरी - ३३ हजार २९९, हदगाव - ७४ हजार ८४५, हिमायतनगर - ३४ हजार ४४८, किनवट - ५१ हजार २३० तर माहूर तालुक्यातील २४ हजार ७२ शेतक-यांचा समावेश आहे.
उर्वरित रक्कम दुसरा टप्पा प्राप्त होताच शेतक-यांच्या खात्यात जमा केले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पूर्ण रक्कम दिली असती तर काही तालुक्यातील शेतकरी वंचित राहून अनुदान वाटपाचा गोंधळ उडाला असता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ५० टक्के रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनुदानापासून कोणी बाधित शेतकरी वंचित राहिलेला नाही.
अनुदानाची उर्वरित रक्कम कधी मिळणार
पहिल्या टप्प्यातील रक्कम खात्यात जमा झाली आहे. परंतु, शासनाने एकदाच अनुदान जमा करणे गरजेचे होते. अतिवृष्टीने होऊन जवळपास पाच महिने लोटले असून अद्यापपर्यंत दुसरा टप्पा मिळालेला नाही. तो कधी मिळेल, याची शाश्वती नाही.
- चांदोजी जोगदंड, शेतकरी
प्रत्येक शेतक-यांच्या खात्यात निम्मी रक्कम
शासनाकडून पहिल्या टप्प्यात जवळपास २८४ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. अतिवृष्टीने बाधित शेतक-यांच्या खात्यात ५० टक्के रक्कम जमा केली आहे. दुसरा टप्पा प्राप्त होताच उर्वरित रक्कम जमा केली जाईल. - प्रदीप कुलकर्णी,
निवासी उपजिल्हाधिकारी