१ तारखेला निवृत्तीवेतन खात्यात जमा; पेन्शन वाटपात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 11:14 AM2017-12-06T11:14:49+5:302017-12-06T11:16:41+5:30
जिल्ह्यात असलेल्या विविध विभागांच्या पेन्शनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेत वाटप करण्यात नांदेड जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे.
नांदेड : जिल्ह्यात असलेल्या विविध विभागांच्या पेन्शनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेत वाटप करण्यात नांदेड जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे. मागील तीन वर्षांपासून दरमहा एक तारखेला निवृत्तीवेतन जिल्ह्यातील पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होते.
जिल्ह्यात विविध विभागांचे २१ हजार ५०० पेन्शनधारक आहेत. या पेन्शनधारकांना नियमित निवृत्तीवेतन देण्यासाठी कोषागार अधिकारी कार्यालय तत्पर असते. मागील तीन वर्षांपासून दरमहा एक तारखेला निवृत्तीवेतन पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये आॅनलाईन जमा केले जाते. यामुळे जिल्ह्यात पेन्शनधारकांची कोणतीही अडचण उद्भवली नाही. कोषागार विभागाकडून निवृत्तीवेतन वेळेत मिळण्यासाठी एखादे देयक थांबवले जाते मात्र पेन्शनधारकांचे निवृत्तीवेतन अदा करण्यास प्राधान्य दिले जाते.यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोषागार विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील राहतात.
पेन्शनधारकांनी १५ डिसेंबरपर्यंत स्वाक्ष-या कराव्यात
पेन्शनधारकांना १ नोव्हेंबर १५ डिसेंबर या कालावधीत ज्या बँकेतून आपण पेन्शन घेतो तेथील रजिस्टरवर आपली स्वाक्षरी करावयाची आहे. पेन्शनधारकांची स्वाक्षरी ही हयात पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. बँकांमध्ये पेन्शनधारकांना स्वाक्षरीसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवले आहे. १५ डिसेंबरनंतर जे पेन्शनधारक बँकांतील रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करु शकले नाही त्यांच्यासाठी ही सुविधा कोषागार कार्यालयात ३० डिसेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे. ज्या पेन्शनधारकांच्या प्रकृतीचा विषय आहे त्यांच्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल, असेही कोषागार विभागाने कळवले आहे. बँकांनीही पेन्शनर्सच्या स्वाक्षरीसाठी सहकार्याची भूमिका ठेवावी व पेन्शनपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.