वंचित आघाडी २८८ जागा लढविणार; ५ हजार ६९५ जणांनी दिल्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 01:41 AM2019-09-14T01:41:39+5:302019-09-14T01:42:01+5:30
मुस्लिम, धनगर, माळी, लिंगायत यांच्यासह ओबीसी प्रवर्गातील अनेक छोट्या जाती वंचितसोबत जोडल्या आहेत़ ओबीसीमध्ये सुमारे ३७० जाती असून त्यांना उमेदवारीमध्ये सामावून घ्यायचे आहे़
नांदेड : राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढणार आहे़ या जागांसाठी ५ हजार ६९५ जणांनी वंचितकडे मुलाखती दिल्या असून, यामध्ये सर्व जाती-धर्मातील उच्च शिक्षितांचा समावेश आहे़ साधारण ७५ टक्के मतदारसंघातील उमेदवारांची नावे अंतिम झाली असून, उर्वरित २५ टक्के मतदारसंघातील नावावर चर्चा सुरू आहे़ ती पूर्ण करून येत्या २० सप्टेंबरपूर्वी उमेदवार यादी जाहीर करू अशी माहिती पार्लिमेंटरी बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी दिली़
मुस्लिम, धनगर, माळी, लिंगायत यांच्यासह ओबीसी प्रवर्गातील अनेक छोट्या जाती वंचितसोबत जोडल्या आहेत़ ओबीसीमध्ये सुमारे ३७० जाती असून त्यांना उमेदवारीमध्ये सामावून घ्यायचे आहे़ अशा स्थितीत एमआयएमने मागणी केलेल्या जागा सोडणे शक्य नव्हते, असे पाटील यांनी स्पष्ट केले़ लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजातील चार जणांना उमेदवारी दिली होती़ विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम समाजातील साधारण २५ उमेदवार असतील़ एमआयएमसोबत असतानाही आम्ही मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार होतो आणि एमआयएम नसतानाही आमची तीच भूमिका कायम असल्याचे सांगत एमआयएम सोबत नसली तरी मुस्लिम समाज आजही वंचितसोबत असल्याचा दावा त्यांनी केला़