नायब तहसीलदार चौहाण सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:23+5:302021-02-05T06:08:23+5:30
चार कोटीचा निधी मुखेड - मुखेड तालुक्यातील चांडोळा जिल्हा परिषद गटातील रस्ते दुरुस्तीसाठी चार कोटीचा निधी मंजूर झाला. या ...
चार कोटीचा निधी
मुखेड - मुखेड तालुक्यातील चांडोळा जिल्हा परिषद गटातील रस्ते दुरुस्तीसाठी चार कोटीचा निधी मंजूर झाला. या कामाचे उद्घाटन २८ रोजी करण्यात आले. यावेळी माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर, बालाजी पोतदार, रसुल पटेल, राजू पाटील, विठू पाटील, दासू पाटील, बाळू पाटील, उपअभियंता चितळे आदी उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
मुदखेड - मुदखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला असून, यातील काहींनी नागरिकांना चावा घेण्याचे प्रकारही घडले आहेत. मोकाट कुत्र्यांमुळे लोकांमध्ये भयभीत वातावरण पसरले. नगरपालिकेने मोहीम उघडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सशस्त्र सीमाबलात नियुक्ती
उमरी - तालुक्यातील तळेगाव येथील बापुसाहेब देशमुख गोरठेकर माध्यमिक विद्यालयातील स्वाती विठ्ठलराव पांचाळ हिची सशस्त्र सीमाबलात नियुक्ती झाली. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाल्याने ही नियुक्ती मिळाली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम देशमुख, माजी मुख्याध्यापक एस. एन. सुरकुटवार, मुख्याध्यापक एस. आर. हिवराळे, सतीशराव देशमुख यांनी तिचे स्वागत केले.
वर्गखोलीचे भूमिपूजन
अर्धापूर - भोगाव येथील उर्दू माध्यम शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन ३० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाला मु.अ. पी.एस. सावंत, शा.व्य.स. अध्यक्ष विजय गव्हाणे, रामराव पाटील, काशीराव पाटील, कोंडीबाराव गाढे, तंटामुक्त अध्यक्ष मुगाजी पाटील, उपाध्यक्ष सलीमखान पठाण, गोविदंराव गाढे, चेअरमन पठाण, शेख जावेद, शिवाजी गोल्हेर आदी उपस्थित होते.
मटका जुगार जोरात
भोकर - शहरातील मोंढा, रेल्वे स्टेशन, बिलालनगर, बसस्थानक परिसर, डॉ. आंबेडकर चौक, विश्रामगृह परिसर आदी ठिकाणी मटका, जुगार जोरात सुरू आहे. जवळपास सात ते आठ जण हे अवैध धंदे चालवतात. ठराविक ग्राहकांकडून फोनवर मटका घेतला जातो. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.