शाैचालयांची उभारणी होऊनही पाणंदमुक्तीचा उद्देश सफल होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:04+5:302020-12-23T04:15:04+5:30
नांदेड : स्वच्छ भारत मिशन फेस २ अंतर्गत बेसलाइन सर्वेक्षणातून सुटलेल्या ३१ हजार ५५२ कुटुंबांसाठी शाैचालय उभारणीचे उद्दिष्ट प्रशासनाने ...
नांदेड : स्वच्छ भारत मिशन फेस २ अंतर्गत बेसलाइन सर्वेक्षणातून सुटलेल्या ३१ हजार ५५२ कुटुंबांसाठी शाैचालय उभारणीचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. यातील तब्बल ३१ हजार ४७३ बांधकामे पूर्ण करण्यात यश आले असून केवळ ७९ बांधकामे अपूर्ण आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात शाैचालये नसलेली आणखी १६ कुटुंबे असून जुन्या आणि नव्या योजनेतील ४०० शाैचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. योजनेमुळे घर तेथे शाैचालय उभारणीचे उद्दिष्ष्ट पूर्ण होत असले तरी अद्यापही ग्रामीण भागात या शाैचालयांचा अनेक जण वापर करत नसल्याचे पुढे आल्याने पाणंदमुक्तीचा उद्देश सफल होण्यासाठी जनजागरणाची गरज व्यक्त होत आहे.
शाैचालय बांधकामासाठी जिल्ह्यात बेसलाइन सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांनाही शाैचालय बांधणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ३१ हजार ५५२ शाैचालय बांधणीचे उद्दिष्ष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील ३१ हजार ४७३ शाैचालयांची उभारणी करण्यात आली असून यातील ७९ शाैचालयांची कामे शिल्लक आहेत. शाैचालय उभारणी होत असली तरी त्याच्या वापरासाठी ग्रामीण भागात आणखी जनजागरण करण्याची आवश्यकता दिसून येते.
आणखी ४२३५ शौचालयांची उभारणी
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाैचालय उभारणीसाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. नजरचुकीने सुटलेल्या ४ हजार ३०८ कुटुंबांसाठी नव्याने शाैचालय बांधणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील ४ हजार २३५ बांधकामेही आता पूर्ण झाली.