निधी असूनही केवळ बँक खात्या अभावी बारड विभागातील ४ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 06:32 PM2017-12-21T18:32:03+5:302017-12-21T18:32:34+5:30
मुदखेड तालुक्यातील बारड विभागातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेशापोटीचा निधी २० जुलै २०१६ रोजी जमा झाला आहे. मात्र, केवळ बँक खात्याअभावी विद्यार्थी गणवेशापासून अद्याप वंचित राहिले आहेत.
नांदेड : मुदखेड तालुक्यातील बारड विभागातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेशापोटीचा निधी २० जुलै २०१६ रोजी जमा झाला आहे. मात्र, केवळ बँक खात्याअभावी विद्यार्थी गणवेशापासून अद्याप वंचित राहिले आहेत.
जि़ प़ शाळेत गरीब,सर्वसामान्य कुटुबांतील मुले शिक्षण घेण्यासाठी येतात़ त्यांना शाळेचा गणवेश घेणे शक्य होत नाही़ म्हणून त्यांना गणवेश मिळावा, यासाठी शासनाने मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी सुरु केली, अर्थात १५ आॅगस्ट २०१७ रोजीच विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे आवश्यक होते मात्र तेव्हाही बँकेत खाते उघडण्यात न आल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. पोस्ट आॅफिसमधील कर्मचारी जादा कामाचा ताण सांगून खाते उघडण्यास टाळाटाळ करतात तर शेतकर्यांचे कर्ज बँकेत जमा झाल्याने खाते उघडण्याचे काम नंतर करु, असे बँकेकडून सांगितले जाते, मग आम्ही जावे कुठे? असा सवाल विद्यार्थी, पालकांतून केला जात आहे.
विद्यार्थ्यांचे खाते क्रमांक नसल्याने पैसे कसे जमा करणार? असा प्रश्न शालेय समितीपुढे आहे. बारड विभागात एकूण २७ शाळा बारड विभागात एकूण २७ शाळा आहेत़ यामध्ये विद्यार्थीसंख्या ४१४२ असून मुलांची १९१७ तर मुलींची संख्या २२२५ एवढी आहे़ तालुक्यातील सर्व शाळांकडे विद्यार्थी गणवेशाची रक्कम जमा झाली आहे़, परंतु विद्यार्थ्यांचे खाते निघत नसल्याच्या समस्या आहेत़ शासनाकडून एससी, एसटी, व्हीजेएनटी या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात़ तर शाळेतील सर्वच मुलींना गणवेश दिले जातात़ बँकेचे विद्यार्थी खाते उघडण्याचे धोरण उदासीन असल्याने गणवेशापासून विद्यार्थी वंचित आहेत़ वरिष्ठ यंत्रणेने याची दखल घेवून २६ जानेवारीपूर्वी गणवेश मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे़
खाते त्वरित उघडण्यासाठी बँक मॅनेजर यांना लेखी पत्र देणार आहोत - एम.बी. जाधव, गटविकास अधिकारी, मुदखेड
सर्व शिक्षा अभियानाकडून पहिली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठीचे पैैसे शाळा खाते नंबर मिळाले नसल्याने गणवेशाचे पैसे खात्यावरच जमा आहेत - संजीव मानकरी, मुख्याध्यापक
तीन महिन्यांपासून खाते उघडण्यासंदर्भात आॅनलाईन फॉर्म शाळेतील विद्यार्थ्यांनी भरले आहेत़ खाते नंबर मिळत नसल्याने शाळा खात्यावरुन गणवेशाची रक्कम वर्ग करता येत नाही - शिवानंद पुयड, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, डोंगरगाव