भीती वाटत असल्याने यादीत नाव असूनही लसीकरणासाठी पुढे येण्याचे धाडस होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:08 AM2021-01-24T04:08:56+5:302021-01-24T04:08:56+5:30
नांदेड : जिल्ह्यात सध्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना लस देण्यात येत आहे. परंतु सुरुवातीपासून यामध्ये तांत्रिक अडचणी येत ...
नांदेड : जिल्ह्यात सध्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना लस देण्यात येत आहे. परंतु सुरुवातीपासून यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. पहिल्या दिवशी पाचशेचे उद्दिष्ट असताना केवळ २६२ जणांना ही लस देण्यात आली. तर मागील दोन दिवसांत एक हजार जणांचे उद्दिष्ट असताना केवळ ७४६ जणच लसीकरणासाठी पुढे आले. लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात भीती असल्याने नोंदणी करूनही ही मंडळी गैरहजर राहत आहे.
कोरोना लढ्यात सर्वात पुढे होऊन काम केल्यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना सर्वप्रथम कोरोना लस देण्याचे ठरविण्यात आले. नांदेडमध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु पहिल्याच दिवसापासून लसीकरण संथगतीने सुरू असल्याचे दिसून आले. शुक्रवारी पाचशेपैकी २४६ जणांना तर शनिवारी ४५० जणांना ही लस देण्यात आली. प्रत्यक्ष उद्दिष्ट आणि होणारे लसीकरण यामध्ये तफावत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.