फायनान्सचे कर्ज फेडले तरीही मुलाला उचलून नेत केली मारहाण
By अविनाश पाईकराव | Published: February 1, 2024 06:25 PM2024-02-01T18:25:18+5:302024-02-01T18:25:26+5:30
कंपनीचे कर्मचारी आगाऊचे पैसे भरा म्हणून तगादा लावत होते
नांदेड - ग्राहकाने फायनान्स कंपनीकडून घेतलेले पैसे भरल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी मुलास उचलून नेत कार्यालयात मारहाण करून १४ हजार रूपयांची आगाऊ रक्कम भरा असा दम देवून खंडणीची मागणी केली. या प्रकरणी एका खासगी फायनान्स कंपनीच्या नऊ कर्मचाऱ्यांविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
चारूशिला राहूल धुताडे (रा. मस्तानपुरा, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी हुजूरी खालसा या खासगी फायनान्स कंपनीकडून काही रक्कम घेतली होती. त्यानंतर त्यांनी सर्व मुळ रक्कम व्याजासह फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे भरली होती. मात्र तरीही कंपनीचे कर्मचारी आगाऊचे पैसे भरा म्हणून तगादा लावत होते. ३० जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सदर फायनान्स कंपनीचे नऊ कर्मचारी घरी आले आणि पैस्यांची मागणी केली.
तसेच पैसे देण्यास मनाई केल्याने त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मुलगा सुमेध धुताडे यास मोटारसायकलवर उचलून नेत फायनान्स कंपनीच्या कार्यालयात नेवून जोगींदरसिंग, दिपूसिंग, प्राची, असलम व तेजस यांनी त्यास मारहाण केली. ऐवढेच नाही तर १४ हजाराची रक्कम नाही भरल्यास मुलगा व पतीस जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फायनान्स कंपनीच्या नऊ जणांवर खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक माने हे तपास करीत आहेत.