काँग्रेसची दमदार कामगिरी तरीही,कासराळी ग्रामपंचायत ठक्करवाडांनी राखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:50+5:302021-01-19T04:20:50+5:30
बिलोली तालुक्यातील कासराळी हे येथील माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे जन्मगाव असल्याने, गेल्या २५ वर्षापासून सातत्याने ही ग्रामपंचायत त्यांच्या ...
बिलोली तालुक्यातील कासराळी हे येथील माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे जन्मगाव असल्याने, गेल्या २५ वर्षापासून सातत्याने ही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात राहिली आहे. पुढे याची सर्व सूत्रे त्यांचे चिरंजीव जि.प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी हाती घेतली. यंदाच्या निवडणुकीत नेहमी ठक्करवाड यांच्या विरोधात असणारे यावेळी अडगळीला पडल्याने ठक्करवाडांसमोर यंदा काँग्रेस अल्पसंख्यकचे जिल्हा उपाध्यक्ष माजीद शेख यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून आव्हान दिले होते. दोघांनीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. दोघांनीही केवळ मतदारांच्या दारी भेटी दिल्या. सभा, काॕॅर्नर बैठकासुद्धा येथे झाल्या नाहीत. ठक्करवाड विरोधकांना गुप्तपणे मिळणारा प्रतिसाद पाहून प्रचंड आत्मविश्वास वाढला होता. त्या आधारावर विजयाचे दावे केले जात होते. मात्र प्रत्यक्ष निवडणूक निकाल हा वेगळाच लागला. वाॅर्ड क्र. १,२,३ मध्ये माजीद शेख गटाचे तर, ३,४ ठक्करवाड गटास मिळाले आहेत. सत्तेत बसण्यासाठी संख्याबळ अवघ्या एका सदस्याअभावी कमी पडले. अपेक्षित यश मात्र मिळाले नाही.
सोमवारी बिलोली तहसील प्रांगणात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या माजीद शेख यांच्या गटाचे स्वत: माजीद शेख, शिवशंकर पिराजी कासराळीकर, पूजा शिवाजी शिंदे, मारुती गंगाधर भुरे, जयश्री शेषराव गजलोड हे विजयी झाले तर, ठक्करवाड गटाचे द्वारका ओमप्रकाश गंगुलवार, बासिद कुरेशी, साईप्रसाद गंगुलवार, सविता टोम्पे, कल्पना दंतापल्ले, शिवलीला बसवंत कासराळीकर, शेषराव लंके विजयी झाले. ठक्करवाडांची एकहाती असलेल्या येथील ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या सदस्यांचा इतक्या मोठ्या संख्येने २५ वर्षात पहिल्यांदाच झालेला प्रवेश येथील सत्ताधाऱ्यांवर आता अंकुश ठेवणारा असेल.