महिला शिक्षणाधिकाऱ्यास ४ लाखांची लाच घेताना अटक
By admin | Published: April 7, 2017 02:45 PM2017-04-07T14:45:38+5:302017-04-07T14:45:38+5:30
नांदेड जिल्हा परिषद : शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी मागितली लाच
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 7 - सेवा खंडित काळातील शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे यांना चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी सकाळी ११़३० वाजता जिल्हा परिषदेतच अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक संजय कुलकर्णी यांनी सांगितले, माध्यमिक शिक्षणाधिकारी बिरगे यांनी तक्रारदार दोन शिक्षकांचे २००६ ते २००८ या कालावधीतील भत्त्यासह वेतन ६ लाख २२ हजार तसेच सेवा खंडित काळातील वेतन ६ लाख ४९ हजार काढण्यासाठी प्रत्येकी २ लाख याप्रमाणे ४ लाखांची लाच मागितली़ सदर तक्रारीनुसार बिरगे यांच्या साई आशिष, घर नंबर ७६, छत्रपतीनगर, पूर्णारोड, नांदेड येथे २ एप्रिल रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी कार्यवाही केली.
त्यानुसार तक्रारदार शिक्षक व त्यांच्या सहकारी शिक्षकाकडून ७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात पंचासमक्ष लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९५५ अन्वये वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संजय लाटकर, उपाधीक्षक संजय कुलकर्णी, उत्तम टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दयानंद सरोदे, संगीता पाटील, पोहेकाँ नामदेव सोनकांबळे, सय्यद साजीद शेख चांद, श्रीमती रत्नपारखे, विलास राठोड, ताहेर खान, शेख मुजीब यांनी पार पाडली़
महिन्यात जि़.प.चे दोन अधिकारी लाच प्रकरणात
काही दिवसांपूर्वी समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती़ त्यानंतर शिक्षण विभाग एसीबीच्या कचाट्यात अडकला आहे़