पार्डीकरांचा महामार्गासाठी एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:24 AM2018-02-07T00:24:39+5:302018-02-07T12:18:57+5:30
महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित जमिनीचा पूर्ण शंभर टक्के मावेजा मिळाल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार मंगळवारी पार्डी (ता. अर्धापूर) येथे झालेल्या शेतक-यांच्या बैठकीत करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्धापूर : महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित जमिनीचा पूर्ण शंभर टक्के मावेजा मिळाल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार मंगळवारी पार्डी (ता. अर्धापूर) येथे झालेल्या शेतक-यांच्या बैठकीत करण्यात आला.
महामार्ग क्रमांक ३६१ साठी भूसंपादनाचे काम वेगात सुरु असून, शासनाचे नियम डावलून मनमानी पद्धतीने मूल्यांकन होत असल्याचा आरोप शेतक-यांचा आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळा मावेजा दिला जात आहे. जेवढी जमीन घेण्यात आली, त्याच्या चारपट दर दिला पाहिजे, असा नियम आहे. आवश्यकता भासल्यास मूल्यांकनाच्या पाचपट मावेजा देण्याची तरतूद आहे, असे असताना केवळ ५ गुंठे जमिनीला १०० टक्के मावेजा दिला जात आहे. घेतलेल्या जमिनीचा शंभर टक्के मावेजा देण्याची हमी अधिकारी देत नाहीत, तोपर्यंत या कामासाठी अधिकारी, कर्मचा-यांना शेतक-यांनी शेतात फिरु देवू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले. शेतक-यांनी आपल्या शेतात रोवलेले मोजमापाचे खांब उखडून टाकण्याचा निर्णय यावेळी घेतला. पार्डी येथील रतन देशमुख यांच्या शेतात ही बैठक घेण्यात आली. बैठकीस हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी विठ्ठलराव देशमुख, मारोतराव देशमुख, प्रकाश देशमुख, सदाशिवराव देशमुख, गजानन देशमुख, आनंदराव देशमुख, गोविंद देशमुख, राजकुमार देशमुख, संभाजीराव देशमुख, नारायणराव देशमुख, राहुल पत्रे, अब्दुल मुबीन अब्दुल लतिफ, माधव देशमुख, सुनील कदम, नवनाथ देशमुख, सचिन देशमुख, रत्नाकर देशमुख, आयुब खान, मनसब खान, दत्ता चिलोरे, गोविंद वाघमारे आदी उपस्थित होते.
वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळा मावेजा दिला जात आहे. जेवढी जमीन घेण्यात आली, त्याच्या चारपट दर दिला पाहिजे, असा नियम आहे. आवश्यकता भासल्यास मूल्यांकनाच्या पाचपट मावेजा देण्याची तरतूद आहे, असे असताना केवळ ५ गुंठे जमिनीला १०० टक्के मावेजा दिला जात आहे.