परिपत्रकानुसार अवघड क्षेत्र निश्चित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:07+5:302021-06-26T04:14:07+5:30

दुर्गम भागातील शिक्षकांना सुगम भागात बदली करून घेता येईल यासाठी शासनाने काही निकष निश्चित करून दिले आहेत त्या ...

Determine the difficult area according to the circular | परिपत्रकानुसार अवघड क्षेत्र निश्चित करा

परिपत्रकानुसार अवघड क्षेत्र निश्चित करा

Next

दुर्गम भागातील शिक्षकांना सुगम भागात बदली करून घेता येईल यासाठी शासनाने काही निकष निश्चित करून दिले आहेत त्या परिपत्रकानुसारच नियमाप्रमाणे अवघड क्षेत्र निश्चित करा अशी सूचना आज शिक्षण समितीच्या सभेत नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केली.सदर बाबतीत ठराव समितीचे सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी मांडला होता.

बैठकीस समितीचे ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर, लक्ष्मणराव ठक्करवाड,संध्याताई मुक्तेश्वर धोंडगे, अनुराधा अनिल पाटील, साहेबराव धनगे यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत.शिक्षक शाळेत नियमित उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी शासनाने परवानगी दिली नाही पण या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांना काय करता येईल याबाबत विचार करावा. नवीन पुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत त्यामुळे जुनी पुस्तके विद्यार्थ्यांकडून घेऊन इतर विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करावे. गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना भेटी देण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करावे. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळांना भेटी देऊन गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण कशा प्रकारे पूर्ण करता येईल याबाबत विचार करा.भेटी दिल्यानंतर सदर भेटींच्या फोटोज ग्रुपवर अपलोड करा अशी सूचना शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली.

सभेचे प्रास्ताविक प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले. मागील इतिवृत्ताचे वाचन करून सभेसमोरील विषयांची त्यांनी मांडणी केली. जिल्हा नियोजन समितीकडून अजून निधी प्राप्त झालेला नाही परंतु निधी प्राप्त होईल तत्पूर्वी आवश्यक नियोजन करण्याची सूचना लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी केली. उमरी तालुक्यातील हुंडा पट्टी व माहूरमधील वाई बाजार येथे माध्यमिक शाळेची गरज आहे त्या त्या ठिकाणी आणि त्या तालुक्यातील इतर प्रशालांचे स्थलांतर करण्याची सूचनाही यावेळी मांडण्यात आली.

शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग प्राथमिकच्या वतीने आई बाबांची शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांचा घरी अभ्यास कसा घेता येईल यासाठी पालकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. सद्यस्थितीत प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी यांचा यावेळी आढावा घेण्यात आला. भोकरचे गटशिक्षणाधिकारी व नांदेड येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डी.एस.मठपती यांनी उत्तम काम व सादरीकरण केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक सभापतींनी केले.

सेमीची पुस्तके मागणीप्रमाणे देण्याचे निवेदन साहेबराव धनगे यांनी केले. किती ठिकाणी सेमी चालू आहे. त्याचा प्लान व करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. लिंबगाव येथे मोठी नर्सरी तयार केली आहे. पालकांची संमती घेऊनच फीस वाढवता येते. परस्पर शुल्कवाढ करणे चुकीचे असल्याचे मत यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.व्यंकटराव पाटील गोजेगावकर, संध्याताई मुक्तेश्वर धोंडगे ,अनुराधा अनिल पाटील, लक्ष्मण ठक्करवाड, साहेबराव धनगे यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रत्येक तालुकास्तरावर किमान एक इंग्रजी शाळा स्थापन करण्याच्या बाबतही चर्चा करण्यात आली. तशा पद्धतीचे प्रस्ताव तालुक्यांनी सादर करण्याच्या सूचना केल्या.

बैठकीस माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, दत्तात्रेय मठपती, सहायक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे, सर्व गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.

Web Title: Determine the difficult area according to the circular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.