देगलूर-उदगीर-रेणापूर महामार्गाला छदामही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:12 AM2018-09-10T00:12:36+5:302018-09-10T00:12:59+5:30
देगलूर-उदगीर-रेणापूर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम लवकरात लवकर चालू होण्याची चर्चा या मार्गावरील प्रत्येक गावातील नागरिकांत असतानाच या महामार्गासाठी केंद्र शासनाने एक छदामही मंजूर केला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर देगलूर शहरातील बाह्यवळण रस्त्यासाठी १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आढावा बैठक आयोजित केली आहे.
श्रीधर दीक्षित।
लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर : देगलूर-उदगीर-रेणापूर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम लवकरात लवकर चालू होण्याची चर्चा या मार्गावरील प्रत्येक गावातील नागरिकांत असतानाच या महामार्गासाठी केंद्र शासनाने एक छदामही मंजूर केला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर देगलूर शहरातील बाह्यवळण रस्त्यासाठी १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आढावा बैठक आयोजित केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून देगलूर-उदगीर रस्त्याची दयनीय अवस्था कायम आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. या रस्त्यावरून प्रवास केल्यानंतर पाठीच्या हाडाची अवस्था कशी होते हे या रस्त्यावरून प्रवास केल्यानंतरच कळते. केवळ मजबुरी म्हणून व दुसरा कोणताच पर्याय नाही़ म्हणून नागरिक हे सहन करीत आले आहेत. मोठे वाहन सोडाच दुचाकी चालवणेसुद्धा या रस्यावर अवघड आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरसुद्धा या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या मार्गावरील पूल जीर्ण झाले आहेत़ त्यांची कालमर्यादा केव्हाच संपली आहे. मात्र आपल्या हयातीत हा रस्ता होईल ही आशा नागरिकांनी सोडली असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या राज्य मार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात केले.
देगलूर-उदगीर-रेणापूर या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ही प्राप्त झाला. चार महिन्यांपूर्वी देगलूर ते रावीपर्यंतच्या रस्त्यासाठी ७० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याचे वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीत उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे हा रस्ता आता होणारच अशी चर्चा प्रत्येक गावांत ऐकावयास मिळते. गडकरी यांचा काम करण्याचा धडाका सर्वसामान्य जनतेलाही माहिती आहे. त्यामुळे अत्यंत दुर्दशा झालेल्या रस्त्याचे बांधकाम केव्हा चालू होईल या आशेत जनता आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी व पदाधिकाºयांनी नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला असता तर निधी प्राप्त होवून एव्हाना या रस्त्याचे बांधकाम चालू होण्यासाठी गती मिळाली असती. या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, या महामार्गासाठी अद्यापही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.
राष्ट्रीय महामागार्साठी देगलूर शहरातून जाणाºया शिवाजी उद्यान ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंतचा रस्ता १८० फूट करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र हा रस्ता १८० फूट झाल्यास या रस्त्यावरील अनेक इमारती भुईसपाट होतील. त्यामुळे हा रस्ता १०० फुटाचा की १८० फुटाचा? की सध्या आहे तेवढाच याबाबत अद्यापही संदिग्धता कायम आहे. या रस्त्यावरच नगरपरिषद, शिवाजी उद्यान, तहसील कार्यालय, विद्युत महावितरण कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय व उपजिल्हाधिकाºयांचे निवासस्थान व न्यायाधीशांच्या निवासस्थानासह जुने बसस्थानक आहे. या मार्गावर शासकीय जागा जास्त आहे.
तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे
तेलंगणा व महाराष्ट्राला जवळच्या मार्गाने जोडणारा देगलूर-उदगीर-रेणापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ हा मंजूर झाला असला तरी या महामार्गाच्या बांधणीसाठी अद्यापही निधी उपलब्ध झाला नाही. देगलूरचे आ. सुभाष साबणे, मुखेडचे आ.डॉ.तुषार राठोड, उदगीरचे आ़सुधाकर भालेराव या तीन आमदारांच्या मतदारसंघातील गावातून देगलूर ते उदगीर रस्ता जातो. उपरोक्त तीनही आमदार सत्ताधारी पक्षातील असल्यामुळे या तिघांनी राष्ट्रीय महामार्ग लवकर व्हावा, यासाठी पाठपुरावा केला तर अशक्य असे काही नाही मात्र त्यासाठी इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. देगलूर-उदगीर-रेणापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी सध्या असलेल्या जागेवरच रस्ता तयार करण्यात येईल. जिथे जमिनीची गरज पडल्यास तेवढीच जमीन संपादन करण्यात येणार असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
बाह्यवळण रस्त्यासाठी आढावा बैठक
देगलूर शहरातील बाह्यवळण रस्त्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ मुखेड-मुक्रमाबाद- सावरमाळ - तुंबरपल्ली या महामार्गावरील गावाबाहेरील अथवा शहराबाहेरील वळणरस्ता घेण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १४ सप्टेंबर रोजी आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत देगलूर शहरातून महामार्गाचा रस्ता जाईल की शहराबाहेरुन वळण रस्ता जाईल, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
येत्या पंधरा दिवसांत गडकरींची भेट घेणार -आ. साबणे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ या देगलूर-उदगीर-रेणापूर या महामार्गाच्या बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची येत्या पंधरा दिवसांच्या आत भेट घेणार असल्याचे आ. सुभाष साबणे यांनी सांगितले. तसेच तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याचे आ. साबणे यांनी स्पष्ट केले.
खड्डे बुजविण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाकडे
कार्ला फाटा ते खतगाव पाटी व देगलूर ते रावीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग नांदेड यांच्याकडे देण्यात आले. खड्डे बुजविण्यासाठी साडेपाच कोटींचा निधीही मंजूर होवून तीन महिने उलटले मात्र संबंधित अधिकाºयांना या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची सध्यातरी घाई नसल्याचे स्पष्ट झाले आहे.