Devendra Fadanvis : बायकोनं मारलं तरी हे केंद्राकडे हात दाखवतील, फडणवीसांचा सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 03:53 PM2021-10-25T15:53:06+5:302021-10-25T15:53:55+5:30
नांदेड जिल्ह्यातील देगुलर येथे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित सभेला संबोधित करताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार गरिबीविरोधी आहे, फक्त स्वत:च्या परिवारासाठी हे सरकार चालतंय.
मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. गुडघाभर चिखलात आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात, बांधावर जाऊन त्यांच्या पिकांची पाहणी केली, शेतकऱ्यांना धीर दिला. अतिवृष्टीने शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं, वयात आलेलं 17-18 वर्षाचं पोरगं निघून जावं, तशी अवस्था उभं पीक गेल्यानं राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. मात्र, सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीकविमाही नीट मिळेनासा झालाय, असे म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. तसेच, राज्य सरकार विनाकारण सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचेही सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील देगुलर येथे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित सभेला संबोधित करताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार गरिबीविरोधी आहे, फक्त स्वत:च्या परिवारासाठी हे सरकार चालतंय. तुमच्या आणि आमच्या हिस्स्याचा पैसा यांच्या घरात जातोय, इंटरनेटच्या जमान्यातील कॉम्प्युटराईज भ्रष्ट्राचार या सरकारच्या माध्यमातून होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची किती दयनीय अवस्था आहे. या सरकारने मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद करुन टाकलं, कवचकुंडल बंद करुन टाकली. अशोकराव तुम्ही मुंख्यमंत्री होतात, ज्येष्ठ नेते आहात, मग वैधानिक विकास मंडळ बंद केल्यावर तुम्ही एक शब्द का काढला नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
LIVE | Addressing public meeting at Biloli in Nanded district for Deglur by-election.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 25, 2021
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे देगलूर पोट-निवडणुकीसाठी प्रचारसभा@BJP4Maharashtra#BJP#Nanded#Deglurhttps://t.co/2pSOsBpmuC
राज्यात दोनवेळा अतिवृष्टी झाली, पण कुणी येऊन पाहायला तयार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, शेतकरी रडत होतो, त्याच्या शेतात अन् डोळ्यातही पाणी होतं. पण, सरकार एक नवा पैसा द्यायला तयार नाही. विम्याचे पेसैही शेतकऱ्यांना मिळत नाहीत, आमचं सरकार होतं तेव्हा वर्षातून 4 वेळा पैसे मिळाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत होते. आम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. या सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पडतोय, 10 हजार कोटींची घोषणा केली. पण, मागच्या वर्षीच्या घोषणेचेच पैसे अद्याप मिळाले नाहीत. गेल्या वर्षभरात राज्याला केवळ 700 कोटी रुपये सरकारने दिले आहेत. मात्र, एकट्या नांदेड जिल्ह्याला आम्ही 500 कोटी रुपये दिले होते, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारमधील लोकं अतिशय खोटारडे आहेत, दिवसभरात चार-पाचवेळा खोटं बोलल्याशिवाय त्यांना अन्नही जात नाही. त्यामुळे, दिवसभर खोटं बोलतात, काहीही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मी म्हटलं, यांच्या बायकोनं जरी यांना मारलं तरी सांगतील केंद्र सरकारचा हात आहे. त्यांनी दाखवला म्हणून आम्हाला मारलं. केंद्रीय वित्तराज्यमंत्री यांनी सांगितलं की, राज्य सरकारने त्यांच्या हिस्स्याचा प्रिमीयमच भरला नाही, त्यामुळे कंपन्यांनी पीकविमा दिला नाही, असे फडणवीस यांनी जाहीर सभेत सांगितले.