देवेंद्र फडणवीसांनी फोडला शिवसेनेचा नेता, देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 12:38 PM2021-10-03T12:38:43+5:302021-10-03T14:20:36+5:30

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेतील नाराज नेते आणि माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Devendra Fadnavis announces candidate for Deglur-Biloli by-election | देवेंद्र फडणवीसांनी फोडला शिवसेनेचा नेता, देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा

देवेंद्र फडणवीसांनी फोडला शिवसेनेचा नेता, देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा

Next

मुंबई: काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक येत्या 30 ऑक्टोबरला होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसन कंबर कसली असून भाजपनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला खिंडार पाडत सेनेचे नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यासह नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीक पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भाजपने शिवसेनेला मोठा धक्का देत सेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर या देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. 

लवकरच भाजप प्रवेश
शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नरसी नायगावमध्ये दाखल झाले होते. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. आता भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे लवकरच साबणे भाजपात प्रवेश करतील.  

कोण आहेत सुभाष साबणे ?

भाजपकडून देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. साबणे हे यापूर्वी तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. मुखेड विधानसभा मतदार संघातून दोन वेळा तर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात एकवेळ त्यांचा विजय झाला आहे. 2009 च्या निवडणुकीमध्ये सुभाष साबणे यांचा पराभव करून रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष साबणे यांनी रावसाहेब अंतापुरकर यांचा पराभव केला होता. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला. दुर्दैवाने रावसाहेब अंतापुरकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे.  

Web Title: Devendra Fadnavis announces candidate for Deglur-Biloli by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.