तेलंगणात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची रिक्षा उलटली; दोघे जागीच ठार
By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: November 1, 2022 03:30 PM2022-11-01T15:30:17+5:302022-11-01T15:30:44+5:30
भाविक आज सकाळी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील आडली देवीच्या दर्शनाला रिक्षातून जात होते.
शिवणी (जि. नांदेड) : बोधडी येथील भाविक तेलंगणातील आडेली देवीच्या दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात किनवट तालुक्यातील शिवणी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या झळकवाडी गावाजवळील घाटात मंगळवारी (दि.१) सकाळी दहा वाजेच्या सुमारास झाला.
बोधडी, ता. किनवट येथील भाविक आज सकाळी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील आडली देवीच्या दर्शनाला रिक्षातून जात होते. जलधरा ते झळकवाडी मार्गावर असणाऱ्या झळकवाडी येथील उतार असलेल्या घाटात चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात बालाजी पांडुरंग खोकले (१९) व नागेश रामा टारपे (२०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले असून इतर जखमी झाले आहेत. त्यांना शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
ऑटो चालक गणेश गवळे, सुनील रामा टारपे, विशाल चंद्रकांत टारपे, विजय सुरेश टारपे, शंकर डुकरे, वसंत डुकरे, मारुती बोंबले या जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले व नंतर अधिक उपचारासाठी हिमायतनगरकडे रवाना करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच इस्लापूरचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.एस. शेख व बीट आमदार संदीप साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.