धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
By प्रसाद आर्वीकर | Published: December 12, 2023 12:57 PM2023-12-12T12:57:51+5:302023-12-12T12:59:01+5:30
पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सदरचा अपघात घडला असल्याची घटनास्थळ परिसरात चर्चा आहे.
- जयकुमार अडकिने
माहूर: धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या परभणी येथील आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला अंजनखेड जवळ आज पहाटे साडे पाच वाजता भीषण अपघात झाला. यात दोघे जागीच ठार तर तिघांची प्रकृर्ती गंभीर असल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माहूर तालुक्यातील वाई बाजारपासून जवळच अवघ्या तिन कि.मी. अंतरावर असलेल्या सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजनखेड जवळील पुलावर पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, सरफराजपूर ( ता. पालम जि. परभणी) येथील चालकासह पाच जण धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेले होते. तेथून परतीच्या मार्गावर असताना वाटेत चंद्रपूर येथे देवदर्शन घेवून परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात घडल्याचे जखमींकडून सांगण्यात आले.
या भीषण धडकेत डिझायरच्या समोरील बाजूचा अक्षरश: चुराडा होवून यातील रमेश दत्तराव वाघमारे (५०) व लक्ष्मण पंडीत वाघमारे ( ३५ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रंगनाथसंपथराव वाघमारे, रामजी बालाजी बनसोड व बापुराव मारोती वाघमारे यांना गंभीर अवस्थेत माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यातील दोघांची प्रकृर्ती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रेफर केल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, आज दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या अपघातातील स्वीफ्ट डिझायर एम.एच ०२ बी.पी. ९८३६ या वाहनाने पुढे जाणा-या मोठ्या व अवजड वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली. पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सदरचा अपघात घडला असल्याची घटनास्थळ परिसरात चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीसांच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक एस.पी.नागरगोजे यांच्यासह पो.हे.काँ. दारासिंग चौहाण यांनी तातडीने हजर होवून घटनास्थळ पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने प्रकरणात अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही.