डिझेल संपले अन् अपहरणाचा डाव फसला; रस्त्यात बंद पडलेल्या गाडीत मुलाला सोडून अपहरणकर्ते फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:39 PM2021-04-17T17:39:53+5:302021-04-17T17:40:57+5:30

गुरुवारी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या ओमकार याला देगलूर येथील सुभाष नगरातील आरोपी महेश शेषेराव बोईनवाड याने चॉकलेट देऊन गाडी शिकवण्याचा बहाणा केला व त्याचे अपहरण करुन त्याला अज्ञातस्थळी नेले.

Diesel runs out and kidnaping failed; The kidnappers fled leaving the child in a car parked on the road | डिझेल संपले अन् अपहरणाचा डाव फसला; रस्त्यात बंद पडलेल्या गाडीत मुलाला सोडून अपहरणकर्ते फरार

डिझेल संपले अन् अपहरणाचा डाव फसला; रस्त्यात बंद पडलेल्या गाडीत मुलाला सोडून अपहरणकर्ते फरार

Next
ठळक मुद्देआरोपी संशय येऊ नये म्हणून फिर्याद देण्यासही पोलीस ठाण्यात उपस्थितएखाद्या चित्रपटातील कथेला लाजवेल, असा नित्यक्रम आरोपीने रचला होता.

बिलोली (जि. नांदेड) : डिझेल संपल्याने गाडी रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे देगलूर येथील ओमकार अशोक पाटील या ११ वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा अपहरणकर्त्याचा डाव फसला. यावेळी अपहरणकर्ता जागेवरच वाहन व मुलाला तसेच सोडून फरार झाला. दरम्यान, अपहरण करण्याचा प्रयत्न झालेला मुलगा सहीसलामत आपल्या आई-वडिलांकडे सुखरुप पोहोचला. एखाद्या चित्रपटात शोभेल, अशी ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान बडूर येथे उघडकीस आली.

गुरुवारी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या ओमकार याला देगलूर येथील सुभाष नगरातील आरोपी महेश शेषेराव बोईनवाड याने चॉकलेट देऊन गाडी शिकवण्याचा बहाणा केला व त्याचे अपहरण करुन त्याला अज्ञातस्थळी नेले. याचदरम्यान ओमकारच्या अपहरणाची चर्चा संपूर्ण देगलूरमध्ये पसरली. ओमकारच्या घरासमोर जमाव जमा झाला. यावेळी आरोपी महेशही तेथे उपस्थित होता. या गोंधळानंतर ओमकारच्या आई-वडिलांनी देगलूर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली.

बेशुद्ध करण्यासाठी डोक्यावर लोखंडी सळईने प्रहार
दरम्यान, पहाटे ३ वाजता बिलोली तालुक्यातील बडूर येथे मुलाला पळवून घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच ४७ वाय ७८३७)चे डिझेल संपल्यामुळे गाडी थांबली. त्याचवेळी वाहनात असलेल्या मुलाचे रडणे थांबवून त्याला बेशुद्ध करण्याच्या हेतूने आरोपीने लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर प्रहार केले. मुलगा बेशुद्ध झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी गावात डिझेल आणण्यासाठी गेला.

अन् वृद्ध धावला मदतीसाठी
आरोपी डिझेल आणण्यासाठी गेल्यानंतर ओमकार शुद्धीवर आला व त्याने ‘वाचवा, वाचवा’ अशी हाक दिली. ही हाक ऐकून बडूर येथील वृद्ध रामराव गुजरवाड (६८) यांनी गाडीकडे धाव घेतली व त्यांनी अन्य लोकांनाही त्याठिकाणी बोलावले. या दरम्यान डिझेल घेऊन आलेल्या आरोपीने तेथे जमलेला जमाव व परिस्थिती पाहून वाहन, मोबाईल व अन्य साहित्य जाग्यावरच सोडून पलायन केले. त्यानंतर ओमकारकडून मिळालेल्या माहितीआधारे गुजरवाड यांनी त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधला व नंतर सगरोळी येथील त्याचे नातेवाईक संजय पाटील-सगरोळीकर व ग्रामस्थांनी ओमकारला बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. तेथे बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश तोटावार यांनी त्याच्यावर उपचार केले. या घटनेची माहिती मिळताच देगलूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, जमादार सुनील पत्रे, पोलीस कर्मचारी सुनील कदम, बिलोलीचे सहाय्यक फौजदार माधव वाडेकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे अधिक तपास करत आहेत.

संशय येऊ नये म्हणून फिर्याद देण्यासही पोलीस ठाण्यात उपस्थित
आरोपी बोईनवाड हा मूळचा मुखेड तालुक्यातील कोळनूर येथील रहिवासी आहे. तो मुंबईत वास्तव्याला होता. लॉकडाऊन दरम्यान तो देगलूर येथे आला. अपहृत मुलाच्या शेजारीच तो राहात होता. मुलाचे अपहरण करून कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो दिवसभर कोळनुरे कुटुंबियांसोबत होता. देगलूर पोलीस ठाण्यातही तो फिर्याद देण्यास गेला होता. एखाद्या चित्रपटातील कथेला लाजवेल, असा नित्यक्रम आरोपीने रचला होता. मात्र, गाडीतील डिझेल संपल्याने त्याचा संपूर्ण डाव फसला.

Web Title: Diesel runs out and kidnaping failed; The kidnappers fled leaving the child in a car parked on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.