नांदेड महापालिकेच्या महापौरपदी दीक्षा धबाले यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:26 AM2019-06-02T00:26:55+5:302019-06-02T00:28:43+5:30
महापालिकेत शनिवारी झालेल्या विशेष सभेत पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती. ११ वाजता सभेला सुरुवात झाली. १५ मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले.
नांदेड : नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले यांची शनिवारी ७० विरुद्ध ४ अशा मतफरकाने निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाच्या बेबीताई गुपिले यांना केवळ चार मते मिळाली.
महापालिकेत शनिवारी झालेल्या विशेष सभेत पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती. ११ वाजता सभेला सुरुवात झाली. १५ मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. हात उंचावून झालेल्या या मतदान प्रक्रियेत काँग्रेसच्या दीक्षा धबाले यांना ७० तर भाजपाच्या बेबीताई गुपिले यांना ४ मते मिळाली. धबाले यांनी एकतर्फी विजय मिळविला.
महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. ८१ पैकी ७३ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. भाजपाचे ६, शिवसेना-१ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल महापालिकेत आहे.
शनिवारी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत एकूण सात सदस्य अनुपस्थित राहिले. त्यात काँग्रेसचे चार सदस्य तर भाजपाचे दोन आणि शिवसेनेचा एकमेव सदस्य अनुपस्थित होता. अनुपस्थित सदस्यांमध्ये काँग्रेसच्या दीपाली मोरे, संगीता बिरकले, आयशा बेगम, साबिया बेगम तर भाजपाच्या इंदुबाई घोगरे, दीपकसिंह रावत आणि शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांचा समावेश होता.
काँग्रेसच्या निर्णयाप्रमाणे महापालिकेचे महापौरपद हे सव्वा वर्षांसाठी निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार शीलाताई भवरे यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला. काँग्रेसकडून दीक्षा धबाले यांचा एकमेव अर्ज आला होता तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून बेबिताई गुपिले यांनी अर्ज दाखल केला होता. निवडीनंतर आ. अमरनाथ राजूरकर, आ. डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत धबाले यांनी पदभार स्वीकारला.
पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य- दीक्षा धबाले
महापौरपदी निवड झाल्यानंतर महापौर दीक्षा धबाले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. अमिता चव्हाण, आ. अमर राजूरकर, आ. सावंत यांनी महापौरपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार व्यक्त केले. शहरात सध्या पाणीटंचाईचा विषय ऐरणीवर आला आहे. हा विषय सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. शहर स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती त्यासह महापालिकेचे उत्पन्नवाढ यावरही आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे धबाले यांनी सांगितले.
उपमहापौर विनय गिरडे यांचा राजीनामा
काँग्रेसच्या सव्वा वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौर विनय गिरडे यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. २२ मे रोजी महापौर शीला भवरे यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी गिरडे यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळाल्याची चर्चा झाली. मात्र १ जून रोजी अखेर गिरडे यांचाही काँग्रेस पक्षाने राजीनामा घेतला. आता नवा उपमहापौर कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.