जिद्दीला सलाम! ऐन तारूण्यात आलेले अपंगत्व अन् संघर्षातूनही ‘ती’चा अटकेपार झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 06:50 PM2022-09-01T18:50:07+5:302022-09-01T18:52:35+5:30
संघर्षमय जीवनप्रवास : शेतकरी कन्या भाग्यश्रीची ऐतिहासिक कामगिरी
नांदेड : घरातील आर्थिक परिस्थिती जेमतेम, वडील शेतकरी स्वत दिव्यांग. परंतु, अशा अनंत अडचणी अन् आर्थिक परिस्थितीला चार हात करत तिने यशोशिखर गाठले. जीवापाड घेतलेल्या मेहनतीतून या शेतकरी कन्येने गोळाफेक या क्रीडा स्पर्धेत एफ ३४ या वर्गवारीत पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या कामगिरीच्या माध्यमातून तीने नांदेडचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले.
मुखेड तालुक्यातील होनवडज येथील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील भाग्यश्री माधव जाधव हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या खेळाला जपण्याचे काम केले. तिने खेळाच्या जोरावर स्थानिक पातळीपासून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, कांस्य अशा विविध पदकांची कमाई केली आहे. टोकिओ येथे ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघात नांदेडच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा समावेश होता. महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला खेळाडू राहिली.
चीनमध्ये मे २०१९ मध्ये झालेल्या जागतिक पॅराअॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिने चमकदार क्रीडा कौशल्य सादर करुन दोन कांस्य पदकांवर भारताचे नाव कोरले. क्रीडा क्षेत्रात गगन भरारी घेत तिने चीनमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने फडकविला आहे.
२०२१ मध्ये दुबई येथे झालेल्या फाजा पॅरा ॲथॅलेटिक्स ग्रँड प्रिक्स या जागतिक स्पर्धेत देखील तिने गोळाफेकमध्ये रौप्यपदक, तर भालाफेक या क्रीडा प्रकारात तिने कांस्यपदक मिळवून भारताची शान राखली होती. परंतु, ऑगस्ट २०२१ मध्ये जपानमधील टोकीओमध्ये झालेल्या पॅरा ऑलिंम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करूनही पदक मिळाले नाही. जगात सातव्या क्रमांकावर असून दिव्यांगामध्ये या क्रीडा प्रकारात ती भारतात नेहमीच अव्वल राहिली आहे.
संघर्षमयी आयुष्यात तिने कधीच हार मानली नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देत तिने जिद्दीने हा प्रवास सुरू ठेवला आहे. या प्रवासात तिला कुटुंबियासह समाजातील दातृत्व भाव असलेल्या अनेकांनी मोलाची साथ दिली आहे. काही दिवसांपूर्वीच बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आयुष्यबरोबर तिच्या खेळाचाही आधार बनली ती माऊली...
आई पुष्पाबाई हिची सोबत सदैव सावलीसारखी होतीच. वेळप्रसंगी आईने तिला फेकलेला गोळा परत तिच्या हातात आणून देणे. तिच्या आयुष्याबरोबरच खेळाचाही आधार आई बनली. त्यामुळेच भाग्यश्री सातासमुद्रापार पोहचू शकली. दररोज मैदानात आल्यावर भाग्यश्रीला खूर्चीवर बसून सराव करावा लागत असे ती खुर्ची दररोज ठोकून बसवून व परत काढणे, हे काम करताना त्या माऊलीच्या हाताला घट्टे पडले.