स्वारातीम विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:40 AM2019-06-01T00:40:37+5:302019-06-01T00:42:11+5:30
२०१३ मध्ये या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्यामुळे २०१९ मध्ये पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याचा मान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास मिळाला आहे.
नांदेड : २०१३ मध्ये या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्यामुळे २०१९ मध्ये पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याचा मान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास मिळाला आहे. दहा दिवस चालणाऱ्या या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ३ जून रोजी सकाळी १० वाजता राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे राहणार असून राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई येथील राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी डॉ. अतुल साळुंके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी विद्यापीठ युवकांचा एक सहाय्य गट तयार करण्यासाठी २००७ पासून राज्यपालांकडून आव्हान-चान्सलर्स ब्रिगेड: राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर राबविण्यात येते. संपूर्ण भारतात फक्त महाराष्ट्र राज्यातच हा उपक्रम चालविला जातो. ३ ते १२ जून दरम्यान या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन विद्यापीठ परिसरात केले आहे.
प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवकांचे गोदावरी, मांजरा, पेनगंगा, पूर्णा आणि आसना हे पाच गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटास वेगवेगळ्या कलरचे टी-शर्ट देण्यात येणार आहेत.
सभागृहामध्ये पुनरुज्जीवन (बाळ, प्रोढ), श्वासावरोध (बाळ, प्रोढ), रक्तस्त्राव, बँडेज किंवा पट्ट्या, अस्थिभंग बाजूचा, अस्थिभंग (उपबाजूचा), मांडीचा अस्थिभंग, मानेच्या मणक्याचा अस्थिभंग, रिकव्हरी पोझीशन, झटके (अपस्मार) प्रोढ, ममार्घात (शॉक), उष्माघात, विजेचा धक्का, नाकातील रक्तस्त्राव, डोळ्यातील आगंतुक वस्तू, डोळ्यात रासायनिक द्रव्य गेल्यास, श्वानदंश, प्रथमोपचार पेटी, गाठींचे विविध प्रकार, रुग्ण वाहतूक पद्धती आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अग्नी आपत्तीचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या खेळाच्या मैदानावर देण्यात येणार आहे. यामध्ये आगीपासून बचाव, आग लागू नये म्हणून घ्यावयाची काळजी, एक्स्टिंग्युशर सिलेंडर वापरावयाची पद्धत आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जल आपत्तीचे प्रशिक्षण डॉ.शंकरराव चव्हाण जलाशयात पूर व बचावकार्य आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इमारतीमधील आपत्तीचे प्रशिक्षण ज्ञान स्त्रोत केंद्राच्या इमारतीत देण्यात येणार आहे. आव्हान-२०१९ या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये स्वंयसेवकांना बोअरवेलच्या आपत्ती विषयीचे सविस्तर विद्यापीठ परिसरातील बोअरवेल जवळ मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात असून यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.आर,एम.मुलानी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. जी.बी. कतलाकुटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, आव्हान-२०१९ चे समन्वयक डॉ. अविनाश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती, नावनोंदणी समिती, निवास व्यवस्था समिती, वाहतूक समिती,भोजन व पाणी व्यवस्था समिती, मंडप व्यवस्था समिती, प्रसिद्धी समिती, समन्वय समिती, आरोग्य समिती, खरेदी व लेखा समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती या व इत्तर समित्या गठीत केल्या आहेत़
सदर शिबीरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.आर.एम. मुलानी, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.अविनाश कदम यांनी केले आहे.
कृषी, अकृषी विद्यापीठाच्या स्वयंसेवकांची हजेरी
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे पारितोषिक वितरण व समारोप समारंभ औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.रवींद्र सिंगल यांच्या हस्ते १२ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर संपन्न होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे राहणार असून डॉ. अतुल साळुंके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़
शिबिरासाठी राज्यातील सर्व कृषी व अकृषी विद्यापीठातील प्रत्येक जिल्ह्यातून २० स्वयंसेवक आणि १० स्वयंसेविका असे ३० स्वयंसेवक याप्रमाणे ११६३ राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ७३ कार्यक्रम अधिकारी सहभागी होणार आहे. या स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन आणि प्रथमोपचार पद्धतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तळेगाव, पुणे येथील ५० प्रशिक्षक देणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाºया स्वंयसेवकांच्या संघास चांसलर्स ब्रिगेड म्हणून संबोधले जाते.