जिल्हा आरोग्य अधिकार्यांची नकारघंटा
By admin | Published: December 22, 2014 02:57 PM2014-12-22T14:57:17+5:302014-12-22T14:59:37+5:30
जिल्ह्यातील विविध भागात ११ बोगस डॉक्टर असल्याची बाब तालुका आरोग्य अधिकार्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई कोण करावी, हा प्रश्न पुढे आला आहे.
नांदेड : जिल्ह्यातील विविध भागात ११ बोगस डॉक्टर असल्याची बाब तालुका आरोग्य अधिकार्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई कोण करावी, हा प्रश्न पुढे आला आहे.
बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी मात्र बोगस कारवाईसंदर्भात प्राप्त असलेल्या अधिकाराच्या आदेशाची प्रतच नसल्याने कारवाईचा प्रश्नच नसल्याचा आश्चर्यकारक खुलासा केला आहे. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरूद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी २0११ मध्ये मोहीम उघडली होती. यात जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील मंडळ अधिकार्यांसह, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, पोलिस विभागालाही सहभागी करून घेताना कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. कार्यवाहीचा अहवाल दरमहा देण्याबाबतही परदेशी यांनी संबंधितांना सूचना दिल्या होत्या. इतकेच नव्हे, तर एखादा बोगस डॉक्टर आढळल्यास त्या भागातील मंडळ अधिकार्यांसह संबंधित पोलिस अधिकार्यांनाही जबाबदार धरून त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. जिल्हाधिकार्यांच्या या कठोर भूमिकेमुळे त्यावेळी बोगस डॉक्टरांनी आपला गाशा गुंडाळला होता. मात्र परदेशी यांची बदली होताच पुन्हा एकदा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी डोके वर काढले आहे. ही बाब खुद्द जिल्ह्यातील आरोग्य अधिकार्यांनी माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या अहवालावरून स्पष्ट झाली आहे.
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या अहवालानुसार कुंडलवाडी येथील नवाब अहमद नवाज, बाबु पुंडलिक बसापुरे, बालाजी हामंद, व आरळी येथील शिवाजी व्यंकट होनराव आणि उज्ज्वला शिवाजी होनराव हे अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे सांगितले आहे. तर बिलोली तालुक्यातीलच लोहगाव येथील वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या अहवालानुसार बेळकोणी खु. येथील धोंडिबा रायकर, डॉ. तिवारी, डॉ. सुब्रम्हण्यम, डॉ. प्रा.बिरदाहीम, डॉ. राजेश्वर आणि कासराळी येथील श्रीकांत पेडकर हेही अनाधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनात आणून दिले आहे.
जिल्ह्यात अन्य तालुका वैद्यकीय अधिकार्यांनीही अहवाल दिले असून कुठेही अनधिकृत डॉक्टर नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा अहवाल किती खरा किती खोटा हा संशोधनाचा विषय असला तरी ज्या ठिकाणी बोगस डॉक्टर कार्यरत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असताना ती करावी कुणी हा प्रश्न जिल्हा परिषद आरोग्य अधिकार्यांनी उपस्थित केला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. परदेशी यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी बोगस डॉक्टरांविरूद्ध कोणती कारवाई करावी याबाबत याबाबत महसूल विभाग, पोलिस अधिकार्यांना मार्गदर्शन कराव्यात अशा सूचना दिल्या होत्या. मात्र विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी कारवाईसंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकार्यांना अधिकार नसल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते मोतीराम काळे यांनी मागितलेल्या एका माहितीत सांगितली आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीत सदस्य सचिव असलेल्या आरोग्य अधिकार्यांनी कारवाई करू नये तर ती समिती अध्यक्ष जिल्हाधिकार्यांनीच करावी काय असा प्रश्न पुढे येत आहे. दरम्यान, कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी मोतीराम काळे यांनी केली आहे. /(प्रतिनिधी)
■ जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरूद्ध २0११ पासून कोणतीही कारवाईच झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्यांनी अनधिकृत डॉक्टरांना साथच आहे की काय अशी शंकाही घेतली जात आहे. बोगस डॉक्टरांच्या उपचारांमुळे अनेक रूग्णांना जीव गमवावा लागत आहे. शासनाने बोगस डॉक्टरांविरूद्ध गठीत केलेल्या समितींनीच कारवाईसंदर्भात हात वर केले तर कारवाई करावी कुणी, की बोगस डॉक्टरांकडून निष्पाप नागरिकांच्या आरोग्याशी असेच खेळू द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.