रौप्य महोत्सवानिमित्त बालसाहित्यावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:38 AM2019-03-09T00:38:03+5:302019-03-09T00:38:25+5:30
महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर सतत दुर्लक्षिल्या जाणाऱ्या बालसाहित्यावर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १५ व १६ मार्च रोजी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती संकुलात चर्चासत्र आयोजन केले आहे.
नांदेड : महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर सतत दुर्लक्षिल्या जाणाऱ्या बालसाहित्यावर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १५ व १६ मार्च रोजी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती संकुलात चर्चासत्र आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनात देश-विदेशांतील मान्यता मिळालेले बालसाहित्यिक सहभागी होणार आहेत़
विद्यापीठाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात लेखिका माधुरी पुरंदरे, कथाकार राजीव तांबे, मुलांचे आवडते लेखक अनंत भावे, कवी श्रीकांत देशमुख यांच्यासह भोपाळ येथील ‘चकमक’ चे संपादक सुशील शुक्ल यांना ऐकण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या संधी आणि चित्रकला, संगीत, नाटक, व्यक्तिमत्त्व विकास, बालशिक्षण, ज्ञानरचनावाद अशा विविध मुद्यांची मांडणी राज्याच्या विविध भागांतून आलेले बालसाहित्यिक आणि समीक्षक करणार आहेत. माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते आणि कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. सुशील शुक्ल हे बीजभाषण करतील.
समारोपाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. केशव देशमुख हे असतील. यावेळी राजीव तांबे, अनंत भावे, श्रीकांत देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. दोन दिवसांतील विविध सत्रांमध्ये नामदेव माळी, सुरेश सावंत, प्रशांत गौतम, सुभाष विभुते, विद्या सुर्वे, किरण केंद्रे, फारुख काझी, जगदीश कदम, नरेंद्र लांलेवार, देवीदास फुलारी, अनिरुद्ध गोगटे, किशोर दरक, सुनीता बोर्डे, श्रीनिवास आगवणे, संजय जोशी, माया धुप्पड, रावसाहेब जाधव, दीपा बियाणी, अर्चना डावरे, सुचिता पाटील, नाथा चितळे, दिलीप चव्हाण, माधव चुकेवाड, स्वाती काटे, शिवाजी अंबुलगगेकर, एन. सी. अनुराधा, झीनत खान, झिशान अली, पी. विठ्ठल, नीना गोगटे, योगिनी सातारकर, हमीद अश्रफ, मोहमद मकबूल अहमद, विशाल तायडे, सत्यकाम पाठक, सारिका केदार, गिरीष जकापुरे यांच्यासह विविध मान्यवर मांडणी करणार आहेत.
चर्चासत्राला प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. एम. के. पाटील, कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा संचालक डॉ. रवी सरोदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भाषा संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण आणि संयोजन सचिव डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.
फ्योदर दस्तयेवस्कीच्या साहित्यावर चर्चासत्र
भाषा, वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि दिल्ली येथील कॉपर कॉइन पब्लिशिंग यांच्या संयुक्त विद्यमाने फ्योदर दस्तयेवस्की (१८२१-८१) यांच्या साहित्यावर दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे. ९ व १० मार्च रोजी भाषा संकुलात आयोजित करण्यात आलेले फ्योदर दस्तयेवस्की यांच्या साहित्यावरील मराठीतील कदाचित हे पहिलेच चर्चासत्र असल्याची असल्याची माहिती संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी दिली आहे. फ्योदर दस्तयेवस्की हे रशियातील एकोणिसाव्या शतकातील एक महत्त्वाचे कादंबरीकार असून जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट कादंबरीकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. ते क्राईम अँड पनिशमेंट (गुन्हा आणि प्रायश्चित्य) या मुख्यत: ओळखले जात असले तरी कारामाझाफ बंधू, जादुगार, द इडियट द पझेस्ट या त्यांच्या कादंबऱ्यांदेखील विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांनी एकूण ११ कादंबऱ्यांचे लेखन केले असून अनेक कथादेखील त्यांनी लिहिल्या आहेत. या चर्चासत्रात गणेश कनाटे (मुंबई), देवदत्त राजाध्यक्ष (मुंबई), वसंत आबाजी डहाके (अमरावती), दिवाकर आचार्य (अकोला) सहभागी होत आहेत. या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. रमजान मुलानी आणि कॉपर कॉइन पब्लिशिंगचे संचालक मनोज पाठक यांनी केले आहे.