हदगाव तालुक्यातील दहा गावांतील योजनांची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:39 AM2018-03-31T00:39:00+5:302018-03-31T13:05:58+5:30
१४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा करणा-या योजनांचे वीजबिल थकल्याने दिवसेंदिवस बिलांचा आकडा वाढत गेला. दरम्यान, वीज पुरवठा खंडित केल्यानंतरच लोकप्रतिनिधींकडून दबाव टाकून चारअंकी आकड्याचे वीजबिल भरून वेळ मारून नेली जात आहे़ दरम्यान, ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर १३ व्या अथवा १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्याचे बिल भरण्याची अनुमती मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे. तरीही गावपुढारी, ग्रामसेवक ही रक्कम भरण्यास तयार नाहीत़ त्यामुळे मार्च एण्डचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १० गावांतील पाणीपुरवठा करणाºया योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. विशेष म्हणजे, केवळ सावरगाव (माळ) या एकाच गावाने थकित बिलांचा भरणा केला आहे. तर विद्युत बिलांच्या थकबाकीदार यादीमध्ये मनाठा, पळसवाडी, चोरंबा (खु़), वरवट, कवाना, तालंग, माळझरा, जगापूर, गायतोंड, चेंडकापूर या गावांचा समावेश आहे़ मनाठा गावाकडे ५ लाख तर उर्वरित आठ गावांकडे २५ लाख रूपयांची थकबाकी आहे.
थकबाकीपोटी महावितरणने या गावांची वीज खंडित करून आठवडा उलटला तरीही कोणत्याही ग्रामपंचायतींनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ग्रामस्थांकडून सेवाकर वसूल करून बिल भरण्याची तसदी घेतली नाही़ प्रत्येक गावांमध्ये दलित वस्ती, शाळा दुरुस्ती, संरक्षक भिंत, अंगणवाडी दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्याचा हिशेब व बिले काढण्यातच ही मंडळी व्यस्त आहे़ दुसरीकडे सर्वसामान्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तर थकित वीजबिलांचा भरणा केल्याशिवाय संबंधित गावांतील वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे़ त्यामुळे पाण्यासाठीची भटकंती कधी थांबेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
वीजबिल भरल्याशिवाय जोडणी नाही- वाठोरे
वीजबिल भरल्याशिवाय वीजजोडणी करण्यात येणार नाही़ कोणाच्याही दबावाला हे खाते बळी पडणार नाही़ कारण आमच्या नोकरीला धोका निर्माण होत असल्याने इतरांचा विचार का करावा? थकबाकी भरा असे आवाहन अभियंता व्ही़पी़ वाठोरे यांनी केले़