लक्ष विचलित करुन व्यापाऱ्याचे बारा लाख केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 08:27 PM2019-11-07T20:27:45+5:302019-11-07T20:29:04+5:30
चोरट्यांकडून व्यापाऱ्यांना केले जातेय टार्गेट
नांदेड : शहरातील डॉक्टरलेन परिसरात एचडीएफसी बँकेसमोरुन अॅक्टीव्हा या दुचाकीवरुन १२ लाख रुपये असलेली बॅग घेवून जाणाऱ्या व्यापाऱ्याचे लक्ष विचलित करुन बॅग लंपास केली़ ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली़ बॅग उचलल्यानंतर काही क्षणातच चोरटा नजरेआड झाला.
राजेंद्र गाडले हे अडत व्यापारी असून बुधवारी सायंकाळी डॉक्टरलेन भागातील एचडीएफसी बँकेत आले होते़ यावेळी त्यांनी बँकेतून १९ लाख ४६ हजारांची रोकड काढली़ बँकेतूनच एका व्यापाऱ्याला फोन करुन बोलावून घेतले़ त्या व्यापाऱ्याला त्यांनी त्यातील ७ लाख रुपये काढून दिले़ व्यापारी गेल्यानंतर गाडले यांनी आपल्याजवळील बॅगेत उरलेले बारा लाख रुपये ठेवले़ त्यानंतर ते बँकेतून बाहेर पडले़ अॅक्टीव्हा दुचाकीच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी पैशांची बॅग ठेवली़ बँकेपासून थोड्याच अंतरावर ते कदम हॉस्पिटलजवळ आले़ त्याचवेळी मागाहून त्यांना अज्ञात आरोपीने आवाज देत तुमच्या पैशाची बॅग पडली असे सांगितले़ त्यामुळे गाडले यांनी दुचाकी थांबवून मागे वळून पाहिले़ तोपर्यंत दुसऱ्या आरोपीने दुचाकीवरील बॅग उचलून पळ काढला़ काही सेकंदातच ही घटना घडली़ गाडले यांनी चोरट्याला पाहून आरडाओरडही केली़ परंतु तोपर्यंत चोरटा नजरेआड गेला होता़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़ दरम्यान, वजिराबादचे पोनि़संदीप शिवले यांनी घटनास्थळी धाव घेतली़ या ठिकाणी असलेले औषधी दुकान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली़ तसेच या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी करण्याच्या सूचना दिल्या़
चोरट्यांकडून व्यापाऱ्यांना केले जातेय टार्गेट
धनत्रयोदशीच्या दिवशीच सराफा बाजारात चक्करवार या व्यापाऱ्याचा खून करण्यात आला होता़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी कलंबर बु़ परिसरात आणखी एका व्यापाऱ्याला लुबाडण्यात आले होते़ त्यानंतर बुधवारी डॉक्टरलेन भागात व्यापाऱ्याची पैशाची बॅग लांबविण्यात आली़ शहरात चोरट्यांनी अशाप्रकारे आता व्यापाऱ्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे़ त्यामुळे व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे़ दरम्यान, बारड ते बारसगाव रस्त्यावर आखाड्यावर झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या शेरसिंघ उर्फ टायगरचे प्रेत त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ बुधवारीही स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी चकमक झालेल्या ठिकाणी जावून आले़ या ठिकाणची पुन्हा पाहणी करण्यात आली़ पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे शहरवासियांकडून स्वागत करण्यात येत आहे़