उभ्या पिकावर नांगर फिरवलेल्या शेतक-यांशी आणेवारीसंदर्भात जिल्हा कृषीअधिका-यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:43 PM2017-11-15T15:43:34+5:302017-11-15T15:57:14+5:30
जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला.
नांदेड : माळाकोळी येथे पीक आणेवारी चुकीची काढल्यामुळे शेतक-यांनी प्रशासनाच्या निषेधात वाजत गाजत उभ्या पिकावर नांगर फिरवला होता. तसेच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन १३ नोव्हेंबर रोजी शिवाजी चौकात आंदोलन केले होते़ याची दखल घेऊन जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला.
१४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी मोहन शुर, उत्तम घुगे, अर्जुनसिंह बयास यांच्या शेतातील उभ्या पिकाची तसेच उभ्या पिकात नांगर फिरवलेल्या शेतात पाहणी केली व संपूर्ण माहिती घेतली़ यावेळी सोयाबीन, तूर, कापूस या पिकाची त्यांनी बारकाईने पाहणी केली व आणेवारीची वास्तविकता आपण जिल्हाधिकारी यांना सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बंटी तिडके या शेतक-याने परतीच्या मान्सूनमुळे खराब झालेले सोयाबीन दाखवले व ८०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे सांगितले़.
तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे, सरपंच जालींदर कागणे, ज्ञानेश्वर गीते, पर्यवेक्षक सदानंद पोटपल्लेवार, कृषी सहायक बालाजी चिखलीकर, शामसिंह बयास, विठ्ठल जिलेवाड, शंकर तिडके, बालाजी तिडके, बंडु केंद्रे, आदीनाथ मुस्तापुरे, राजु फुलारी, अर्जुनसिंह बयास, सुधाकर राठोड, जगन्नाथ तिडके, निळकंठ तिडके, रघनाथ मोरे विनायक जोशी, राम पवार, व्यंकटराव पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा कृषी अधिकारी डॉ़ तुकाराम मोटे म्हणाले, या भागातील जमीन ही कोरडवाहू व हलक्या प्रतीची असून जूनपासून दोनवेळा पावसाचा पडलेला खंड व पिकावर पडलेले रोग यामुळे या भागातील पिकांचे नुकसान झाले असून आणेवारी संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन वास्तव परिस्थितीचे कथन करणार असल्याची माहिती उपस्थित शेतक-यांना दिली.