कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:02 AM2018-01-07T00:02:52+5:302018-01-07T00:04:04+5:30
जिल्ह्यातील विविध कारखान्यांसह ५६ संस्थांकडे जिल्हा बँकेचे तब्बल १९२ कोटी अनुत्पादित कर्ज थकित आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक झाली असून गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे तर कलंबर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या स्थगितीबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील विविध कारखान्यांसह ५६ संस्थांकडे जिल्हा बँकेचे तब्बल १९२ कोटी अनुत्पादित कर्ज थकित आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक झाली असून गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे तर कलंबर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या स्थगितीबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
ग्रामीण भागाची आर्थिक घडी ही जिल्हा बँकेवर अवलंबून असते. नांदेड जिल्हा बँकेचा ६८ शाखांच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. मात्र थकित कर्जामुळे बँकेवर मर्यादा आल्या आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील ठेवीदारांचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी तसेच बँकेला गतवैैभव मिळवून देण्यासाठी थकित कर्जाची वसुली करणे आवश्यक आहे. शुक्रवारी नवनिर्वाचित अध्यक्ष दिनकर दहीफळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रामुख्याने याच विषयावर चर्चा झाली. बँकेचे थकित कर्ज १९२ कोटी आहे तर संचित तोटा १३४ कोटी रुपये आहे. अनुत्पादित थकित कर्जाची वसुली केल्यानंतरच हा संचित तोटा कमी होऊ शकतो. २००५ पूर्वी हा संचित तोटा ३६२ कोटींच्या घरात होता. मात्र तो आता १३४ कोटींवर आला आहे. थकित कर्ज वसुलीला गती देवून तो आणखी कमी केल्यास जिल्हा बँक पुन्हा रुळावर येऊ शकते. यामुळे गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत प्राधान्याने घेण्यात आला. कलंबर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला मंत्रालयस्तरावरुन स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्याचा निर्णयही घेण्यात आला. जिल्हा बँकेच्या थकबाकीसंदर्भातील अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. ही प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी बँकेच्या वकिलांची स्वतंत्र बैठक घेण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम, संचालक भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, गोविंदराव पाटील नागेलीकर, मोहनराव पाटील टाकळीकर यांच्यासह १३ संचालकांची उपस्थिती होती.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६८ शाखा आहेत. यातील काही शाखा मागील अनेक वर्षांपासून तोट्यात आहेत. या शाखांना ठेवी वाढविण्यासह कर्जाची वसुली करुन आर्थिक पत वाढवावी, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र दिलेल्या मुदतीत या शाखांनी ना ठेवी वाढविल्या ना थकित कर्जाची अपेक्षित वसुली केली. त्यामुळे तोट्यात असलेल्या अशा शाखा पोसायच्या कशाला ? असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित झाला. यावर तोट्यात असलेल्या ७ शाखा बंद करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.