जिल्हा मजदूर युनियन, माकपचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:24+5:302020-12-23T04:15:24+5:30
नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सिटू कामगार संघटनेच्या वतीने ख्रिश्चन दफनभूमी आंदोलनांतर्गत दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीअंतर्गत दोघांची नावे ...
नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सिटू कामगार संघटनेच्या वतीने ख्रिश्चन दफनभूमी आंदोलनांतर्गत दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीअंतर्गत दोघांची नावे वगळल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ डिसेंबरपासून उपोषण सुरू केले आहे.
वजिराबाद ठाण्यांतर्गत दाखल झालेला गुरनं ६/२०२० द्वारे ॲट्रॉसिटी कायद्यातील आर. मंगाचार्यलू व एस.के. वल्ली यांची नावे एफआयआरमध्ये असतानाही ती वगळण्यात आली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांनी ही नावे दोषारोपपत्रातून कमी केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शहरातील खडकपुरा समीराबाग येथील ख्रिश्चन दफनभूमीतील स्वच्छता, अंतर्गत रस्ते, दिवे आदी कामे करावीत, जुना कौठा येथे गोदावरी नदीतील खड्ड्यात तीन बालकांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. अल्का गुल्हाने यांच्या जमीन अधिग्रहणाचा मोबदला तात्काळ अदा करावा, बजरंग कॉलनीमधील नागरी सुविधा पुरवाव्यात आदी मागण्यांसाठी कॉ. मारोती केंद्रे, अनुराधा परसोडे, गंगाधर गायकवाड यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या या उपोषणात सहभागी आहेत.