जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ; व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:31+5:302021-08-19T04:23:31+5:30

जिल्ह्यात १ हजार ६०४ गावे आहेत. यापैकी सर्वच गावे आता कोरोनामुक्त आहेत. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये महापालिका आणि तालुकास्तरावरील रुग्णांचा ...

The district's move towards coronation; Transactions smooth | जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ; व्यवहार सुरळीत

जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ; व्यवहार सुरळीत

Next

जिल्ह्यात १ हजार ६०४ गावे आहेत. यापैकी सर्वच गावे आता कोरोनामुक्त आहेत. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये महापालिका आणि तालुकास्तरावरील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ३५ रुग्ण हे महापालिकेअंतर्गत गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत तर विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०, किनवट १ आणि देगलूर तालुक्यात एका रुग्णावर कोविड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत चार रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ९२ हजार ७७८ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील ५ लाख ८९ हजार ८९९ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला तर ९० हजार ७०५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. या रुग्णांपैकी ८७ हजार ९९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचवेळी २ हजार ६६० रुग्ण हे कोरोनाचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात सध्या आता उपचारानंतर घरी परतण्याचे प्रमाण ९७.१ टक्के इतके झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७ ऑगस्ट २०२० रोजी एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळले होते तर दुसऱ्या लाटेत एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण हे ११ एप्रिल २०२१ रोजी आढळले होते. जिल्ह्यात १०१ रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. त्यात १ हजार १३१ अतिदक्षता बेड होते. तर ऑक्सीजनयुक्त बेडची संख्या २ हजार ३१२ इतकी होती. जिल्ह्यात ८ हजार २९६ खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तर २३६ व्हेन्टीलेटरही रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.

जिल्ह्यात कोरोना मुक्तीवर मात करण्यासाठी उपयोगात आणलेल्या तालुक्यातील भोसी पॅटर्नची पंतप्रधानांनीही दखल घेतली होती. येथे रुग्णांना शेतामध्ये विलगीकरणात ठेवून संपूर्ण गाव एका ठराविक कालावधीत कोरोनामुक्त करण्यात आले होते. हा पॅटर्न उपयुक्त असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले होते. सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला वेग दिला जात आहे. जिल्ह्यात आजघडीला ८ लाख ८९ हजार ८४६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

ग्रामीणमध्ये ९ टक्के मुले बाधित

ग्रामीण भागात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २ हजार २०८ मुले बाधित झाली होती तर दोघांचा मृत्यू झाला होता. ही मुले ० ते १५ वयोगटातील होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५ हजार ८२० मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. हे प्रमाण ८ टक्के इतके होते. एका रुग्णाचा मृत्यूही झाला होता.

प्रतिबंधाची तयारी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीतीही आहेच. त्या दृष्टीनेही ग्रामीण भागात तयारी केली जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

दररोज दोन हजार चाचण्या

जिल्ह्यात कोरोना रुग्णावर वेळेवर उपचार करुन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रतिदिन २ हजार चाचण्या केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचण्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्या मोहिमे अंतर्गतही चाचण्या वाढवण्यात येत आहेत.

Web Title: The district's move towards coronation; Transactions smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.