नांदेड मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर विघ्न; दोन महिन्यांपासून विनावेतनच काम
By शिवराज बिचेवार | Published: August 29, 2022 05:43 PM2022-08-29T17:43:56+5:302022-08-29T17:45:02+5:30
कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन वर महिन्याकाठी जवळपास दहा कोटी रुपये खर्च होतात.
नांदेड - महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असून कंत्राटदारांचे पैसे चक्क गुंठेवारीच्या वसुलीतून अदा करण्यात आले. दुसरीकडे तब्बल दोन हजार कर्मचारी मात्र गेल्या दोन महिन्यांपासून विना वेतनच काम करीत आहेत. ऐन सणासुदीत या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर विघ्न आले आहे.
जीएसटीचे अनुदान मिळाल्यानंतर सप्टेंबरमध्ये हे वेतन होण्याची शक्यता आहे. महापालिकेत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणे ही नित्याचीच बाब झाली आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनसाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च हाेतात. त्या तुलनेत महापालिकेचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे उत्पन्नातून वेतनाचा खर्चही निघत नाही. महापालिका कर्मचाऱ्यांचे अद्याप जुलैचे वेतनच झाले नाही.
नुकतेच वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन देण्यात आले. इतर कर्मचारी मात्र अद्यापही वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिका जीएसटीच्या अनुदानाकडे डोळे लावून बसली आहे. सप्टेंबरमध्ये हे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरही वेतन अदा केले जाणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव, महालक्ष्मी सण कसे साजरे करावेत? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. अनेकांच्या बँकाचे, कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे त्यावरील व्याजाचा भुर्दंडही बसत आहे. ज्या तातडीने कंत्राटदारांच्या पैशासाठी मनपाने घाई गडबड केली. तशी तत्परता मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत दाखविण्यात येत नाही.
कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन वर महिन्याकाठी जवळपास दहा कोटी रुपये खर्च होतात. परंतु अद्याप जीएसटीचे अनुदान मिळाले नाही. अनुदान आल्यानंतर सर्वप्रथम वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांच्या क्रमांक लागतो. सप्टेंबर महिन्यात हे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. - मुख्य लेखाधिकारी,मनपा