लॉकडाऊनमध्ये संसार विस्कटला; मामेभावाशी शेकहँड केला म्हणून घटस्फोट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 06:38 PM2020-11-04T18:38:25+5:302020-11-04T18:43:03+5:30
आता लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर मात्र कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
नांदेड : कोरोनाच्या संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात गेले काही महिने अनेक जण घरातच अडकून पडले होते. आता लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर मात्र कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. मामेभावाला मुलगा झाल्याने त्याला शुभेच्छा देण्यासाठी केवळ हस्तांदोलन केल्यामुळे पतीने तिच्यासोबत काडीमोड घेतला, असे धक्कादायक कारण पुढे आले आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक जण जवळपास पाच महिन्यांहून अधिक काळ घरातच अडकून पडले होते. त्यात भविष्याची चिंता. यामुळे स्वभावात चिडचिडेपणा येणे, अस्वस्थ वाटणे, मन मोकळे करता न येणे, यामुळे कौटुंबिक कलहात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलमध्ये गेल्या दहा महिन्यांत अशा एकूण ६५६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. पती-पत्नींमधील विसंवादाची कारणेही बुचकाळ्यात टाकणारी आणि क्षुल्लक आहेत. मामेभावाला मुलगा झाल्याने शुभेच्छा देण्यासाठी पत्नीने त्याच्यासोबत शेकहँड केल्याची बाब पतीला खटकली. त्यानंतर पतीने पत्नीपासून काडीमोड घेतला. विशेष म्हणजे, महिला आणि मामेभाऊ हे दोघे लहानपणापासून एकत्रच वाढले अन् शिकले होते, तर दुसरीकडे महिलेच्या लग्नालाही केवळ दीड महिना झाला होता; परंतु संशयातून पतीने हे टोकाचे पाऊल उचलले, तर तब्बल २५ टक्के तक्रारी या मोबाईलवर बोलणे, चॅटिंग करणे यातून झाल्या आहेत. यामध्ये पत्नी कुणाशी मोबाईलवर बोलते, चॅटिंग करते याबाबत संशय आल्याने पतीने पत्नीला त्रास देणे सुरू केले, तर जेवणात मीठ कमी पडले, वेळेवर जेवण देत नाही अशी किरकोळ कारणेही काैटुंबिक कलहामागे आहेत.
कौटुंबिक कलहाची ही आहेत कारणे
जास्त वेळ बसून टीव्ही पाहणे, घरात कपडे अस्ताव्यस्त टाकणे, कामात मदत न करणे, सतत मोबाईलवरच गुंग राहणे, मोबाईलवर चॅटिंग, जास्त वेळ बोलणे, आवडीची भाजी आणि वेळेवर जेवण न देणे यासारखी क्षुल्लक कारणे त्यामागे आहेत.
प्रेमाने वागून वाद मिटवावेत
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. भविष्याच्या चिंतेने अनेकांना ग्रासले आहे. त्यात आर्थिक संकट ओढवल्याने मानवी स्वभावानुसार अनेक जण चिडचिड करीत आहेत. त्यामुळे कुटुंबात किरकोळ कारणावरून कलह निर्माण होत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींनी कुटुंबात एकत्र बसून मन मोकळे करावे. एकमेकांशी प्रेमाने वागून वाद मिटवावेत, समजून घ्यावे, तसेच गरज पडल्यास मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
- डाॅ.रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ
संसार पुन्हा जुळविण्याचा प्रयत्न
भरोसा सेलमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच मोठ्या प्रमाणात तक्रारी येण्यास सुरुवात झाली. कौटुंबिक कलहाची कारणे ही किरकोळ आहेत; परंतु त्यातून नातेसंबंध टोकाला गेले आहेत. याठिकाणी आम्ही पती-पत्नीचे समुपदेशन करून तुटलेला संसार पुन्हा जुळविण्याचा प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया भरोसा सेलचे सपोनि. कोलते यांनी दिली.
- कोलते, सहा.पोलीस निरीक्षक